वन डे क्रिकेटमध्ये प्रयोग! पहिल्या १० षटकांत ९ फिल्डर ३० यार्ड सर्कलमध्ये, ४ पॉवर प्ले अन्...

भारताचा माजी स्टार फलंदाज गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) वन डे क्रिकेटमधील उत्साह परत आणण्यासाठी काही प्रयोग सुचवले आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या काळात वन डे क्रिकेट लोकांना कंटाळवाणे वाटू लागले आहे आणि गंभीरच्या मते त्याने सुचवलेल्या सल्ल्याने वन डे क्रिकेट मजेशीर बनू शकते.

वन डे क्रिकेटच्या घसरत्या लोकप्रियतेची चिंता सतावत असतान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने या फॉर्मेटमध्ये आमूलाग्र बदल सुचवले आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या प्रचंड वाढीमुळे वन डे फॉर्मेटकडे प्रेक्षक पाठ फिरवत आहेत. गंभीरने वन डे क्रिकेटमधील उत्साह वाढवण्यासाठी आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी चार पॉवर-प्ले सादर करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

अलिकडच्या वर्षांत वन डे क्रिकेटचे भवितव्य हा तीव्र चर्चेचा विषय बनला आहे, तज्ञांनी त्याच्या कमी होत चाललेल्या लोकप्रियतेवर चिंता व्यक्त केल्या आहेत. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या उदयाने निःसंशयपणे वन डे सामन्यांच्या लोकप्रियतेवर परिणाम केला आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटच्या लहान आणि अधिक वेगवान स्वरूपामुळे मोठ्या चाहत्यांना आकर्षित केले आहे.

वन डे क्रिकेटच्या कमी होत चाललेल्या चितांचे निराकरण करण्यासाठी, गंभीरने ४ पॉवर प्ले खेळवण्याचा सल्ला दिला आहे. असे केल्याने वन डे क्रिकेट अधिक गतिमान आणि आकर्षक बनेल. प्रत्येक संघाला त्यांच्या डावात प्रत्येकी ५ षटकांच्या चार पॉवर प्ले खेळण्याची संधी मिळावी. यामुळे फलंदाजांना मुक्तपणे धावा करण्याच्या अधिक संधी मिळतील, तसेच गोलंदाजांना लवकर मारा करण्याची आणि दबाव आणण्याची संधी मिळेल.

“पहिल्या १० षटकांमध्ये ३० यार्ड सर्कलमध्ये नऊ क्षेत्ररक्षक उभे करावेत. पुढील २० षटकांसाठी ही संख्या ५ असावी, ३१ ते ४० षटकांमध्ये चार क्षेत्ररक्षक असावेत आणि ४१ ते ५० षटकांत फक्त तीन क्षेत्ररक्षक ३० यार्ड सर्कलमध्ये उभे असावेत. त्यानंतर शेवटच्या १० षटकांमध्ये फिरकीपटूंचा वापर केला जाऊ शकतो, कारण सहा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहेत,” असे गंभीरने स्पोर्ट्सकीडाला सांगितले.

“दोन नवीन चेंडूंनी सुरुवात करा, पण फक्त २० षटकांपर्यंत. २० षटकांनंतर कर्णधाराला दोन चेंडूंपैकी एक निवडण्यास सांगा आणि तो पुढील ३० षटकांसाठी वापरा. हे फिंगर स्पिनर्सना मदत करेल आणि गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग देखील मिळेल,” असेही गंभीर म्हणाला.

गंभीर पुढे म्हणाला, "मला तिरंगी मालिका आणि चार संघांमधील मालिका पाहायला आवडेल. द्विपक्षीय मालिका खेळण्यात मजा नाही. तुम्ही फक्त चार-पाच वेळा एका संघाविरुद्ध खेळत आहात. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड किंवा भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्यात सात-आठ वन डे खेळण्याची कल्पना करा. प्रत्येक दिवस नवीन आव्हान घेऊन येतो,” गंभीर पुढे म्हणाला.