रोहित शर्मा एक प्रतिभावान फलंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने साऱ्यांचेच लक्ष वेधले. सलामीला फलंदाजीला येऊन त्याने शानदार अर्धशतक ठोकले आणि संघाला चांगली सुरूवात दिली.
पण रोहित शर्माची एक सवय केवळ त्याच्या संघातील खेळाडूंनाच नव्हे तर त्याची पत्नी रितिका आणि रोहितच्या मित्रांना खूपच त्रास देते. इतकेच नव्हे तर त्याच्या या सवयीमुळे तो कायम चर्चेचा आणि मस्करीचा विषय ठरताना दिसते.
रोहित शर्मा आपल्या प्रतिस्पर्ध्यांची बॅटने धुलाई करण्याचे कधीच विसरत नाही. पण बारीच्या वेळी मात्र तो अनेकदा अनेक गोष्टी विसरतो आणि त्यामुळे अनेकदा त्याच्यासोबत मजेशीर गोष्टी घडत असतात. आताही असेच पुन्हा घडले.
रोहित शर्मा रांचीतील त्याच्या हॉटेलमधून विमानतळावर आला तेव्हा तो बसमध्ये त्याचा एअरपॉड्सची केस विसरला. रोहित विमानतळाच्या वेटिंग एरियामध्ये बसला होता, त्याला माहितही नव्हते की तो एअरपॉड्स केस विसरला आहे.
त्यानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य त्याच्या जवळ आला आणि त्याने रोहितला त्याची एअरपॉड्स केस दिला. रोहित शर्मानेही सपोर्ट स्टाफ सदस्याचे यासाठी आभार मानले आणि त्यानंतर हसताना दिसला.