Mankading: 1974 पासून मंकडिंगची परंपरा आणि वाद कायम; जाणून घ्या असं कधी-कधी झालंय

इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर मंकडिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दीप्ती शर्माने इंग्लिश फलंदाजाला मंकडिंग करून धाव बाद केल्यामुळे पुन्हा एकदा वाद चिघळला आहे. अनेक दिग्गज आजी माजी खेळाडू यावर प्रतिक्रिया देत आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम मंकडिंगचे प्रकरण 1974-75 मध्ये समोर आले होते. हा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जात होता. तेव्हा दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहिलेले ग्रेग चॅपल यांनी इंग्लंडच्या ब्रायन लकहर्स्टला याच पद्धतीने बाद केले होते.

त्यानंतर अनेक वर्षे एकदिवसीय क्रिकेटमध्ये असे काही पाहायला मिळाले नव्हते. मात्र पुन्हा 1992-93 मध्ये हरारे येथे झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात मंकडिंगचा मुद्दा चर्चेत आला. यावेळी मंकडिंगचा बळी झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ग्रँट फ्लॉवर ठरला आणि त्याला न्यूझीलंडच्या दीपक पटेलने या पद्धतीने धावबाद केले.

यानंतर काही कालावधीनंतर मंकडिंग पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आले. ट्रेंडमध्ये आल्यानंतर मंकडिंग पुन्हा क्रिकेटच्या मैदानात परतले. भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा मंकडिंगची झलक दाखवून दिली. जे त्यांनी 1992-93 मध्ये पोर्ट एलिझाबेथ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केले होते. कपिल यांच्या मंकडिंगचा व्हिडीओ आजही खूप प्रसिद्ध आहे. खरं तर त्यांनी यावेळी पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज पीटर कर्स्टनला इशारा दिला की जर तो चेंडू टाकण्यापूर्वी क्रीजमधून पुढे गेला तर त्याला बाद केले जाईल. पण कर्स्टने त्यांचे ऐकले नाही. यानंतर कपिल यांना राग अनावर झाला आणि पीटर पुन्हा एकदा क्रीजमधून बाहेर आला तेव्हा त्याला मंकडिंग पद्धतीने धावबाद केले.

कपिल देव यांच्या घटनेनंतर मंकडिंग हा शब्द एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून जवळपास 10 वर्षे दूर राहिला. मात्र 2014 मध्ये त्याचे पुन्हा एकदा पुनरागमन झाले आणि यावेळी इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जोस बटलर मंकडिंगचा शिकार ठरला. जोस बटलरला श्रीलंकेच्या सचित्र सेनानायकेने बाद केले होते.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्यांदा अशी घटना 2022 मध्ये समोर आली. लक्षणीय बाब म्हणजे महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मंकडिंगचा प्रयोग करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये भारताच्या दीप्ती शर्माने इंग्लंडच्या चार्ली डीनला बाद केले आणि यासह मंकडिंगने महिला क्रिकेटमध्येही प्रवेश केला. सध्या दीप्तीने केलेल्या या मंकडिंगमुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत.