asia cup 2023 : BCCIच्या एका निर्णयावर एबी डिव्हिलियर्सची नाराजी; म्हणाला, "माझ्यासाठी ही..."

आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू अन् क्रिकेटप्रेमींमध्ये मिस्टर ३६० म्हणून प्रसिद्ध असलेल्या एबी डिव्हिलियर्सने बीसीसीआयच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केली. आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. पण, फिरकीपटू युझवेंद्र चहलला स्थान न मिळाल्याने डिव्हिलियर्सने भारतीय खेळाडूसाठी बॅटिंग केल्याचे दिसते.

३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत टीम इंडियाची घोषणा केली. या संघात युवा तिलक वर्माची सरर्प्राइज एन्ट्री पाहायला मिळाली.

१७ सदस्यीय संघात चहलला संधी न मिळाल्याने क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगली. याशिवाय खुद्द चहलने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली खदखद व्यक्त केली आहे.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीकडून खेळताना एबी डिव्हिलियर्स आणि युझवेंद्र चहल यांची मैत्री घट्ट झाली. याचदरम्यान पाहिलेले चहलचे बारकावे आणि त्याच्यात असलेली क्षमता मिस्टर ३६० ने मांडली आहे.

डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. चहलबद्दल बोलताना तो म्हणाला की, युझीला आशिया चषकाच्या संघातून वगळले ही माझ्यासाठी थोडी निराशाजनक बाब आहे.

तसेच मला वाटते की, युझी हा लेग-स्पिनिंगचा चांगला पर्याय आहे. तो किती कुशल आणि हुशार आहे याची कल्पना मला आहे. पण, आता निर्णय झाला आहे आणि त्यात बदल होणार नाही, असेही डिव्हिलियर्सने सांगितले.

याशिवाय डिव्हिलियर्सने जसप्रीत बुमराहचे देखील कौतुक केले. "बुमराहने दुखापतीतून पुनरागमन करून आयर्लंडमध्ये 'मालिकावीर'चा किताबही जिंकला. यावरून त्याच्यात कोणती प्रतिभा आहे हे दिसून येते. त्यामुळे बुमराहच्या कामगिरीचे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही आणि त्याला फॉर्ममध्ये पाहणे खूपच चांगले आहे", असे डिव्हिलियर्सने नमूद केले.

भारत आशिया चषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात २ सप्टेंबर रोजी कँडी येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून करेल.

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा.