Join us
Daily Top 2Weekly Top 5

चोराच्या उलट्या बोंबा! "लोकांमध्ये द्वेष निर्माण करणारी गोष्ट करू नये", शमी-अख्तर वादात आफ्रिदीची उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 13:49 IST

Open in App
1 / 8

रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 2022च्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. इंग्लंडने पाच गडी राखून पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि विश्वचषकावर नाव कोरले. पाकिस्तानच्या 8 बाद 137 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 19 षटकांत 5 बाद 138 धावा केल्या. आदिल राशिद, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, या गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर बेन स्टोक्सने 49 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकून नाबाद 52 धावा करून इंग्लंडचा विजय पक्का केला.

2 / 8

एकदिवसीय आणि टी-20 असे दोन्ही विश्वचषकाचे जेतेपद एकाच वेळी कायम राखणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला. पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. पाकिस्तानचा पराभव होताच संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तरने नाराजी व्यक्त केली. यावरूनच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अख्तरवर निशाणा साधला आहे.

3 / 8

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लिश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 137 धावा केल्या होत्या. इंग्लंडला टी-20 विश्वचषकाचा नवा चॅम्पियन होण्यासाठी 138 धावांची आवश्यकता होती. बेन स्टोक्सने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लिश संघाने किताब पटकावला आहे.

4 / 8

पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तरने पाकिस्तानी खेळाडूंचे कौतुक केले आहे. पाकिस्तानचा अंतिम फेरीत पराभव होताच शोएब अख्तरने एक ट्विट करून नाराजी व्यक्त केली. यानंतर भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीने शोएब अख्तरच्या या ट्विटला प्रत्युत्तर देऊन निशाणा साधला. ज्यामुळे पाकिस्तानचे माजी खेळाडू चांगलेच संतापले आहेत. अख्तरच्या जखमेवर मीठ शिंपडत शमीने लिहिले, 'सॉरी भाऊ, यालाच कर्म म्हणतात.' शमीच्या या उत्तरानंतर त्याला पाकिस्तानी लोकांकडून खूप ट्रोल केले जात आहे.

5 / 8

पाकिस्तानी चाहते मोहम्मद शमीला ट्रोल करत असतानाच यात संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. शाहिद आफ्रिदीने शमीच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानातील वृत्तवाहिनी समा टीव्हीशी संवाद साधताना आफ्रिदीने म्हटले, 'आम्ही क्रिकेटर आहोत, आम्ही राजदूत आहोत, आम्ही आदर्श आहोत. हे सर्व संपले पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही एकमेकांचे शेजारी आहोत. लोकांमध्ये द्वेष निर्माण होईल असे काही होऊ नये. असे आपणच केले तर सामान्य माणसाकडून काय अपेक्षा ठेवणार. खेळाशी आमचे संबंध अधिक चांगले राहतील. आम्हाला त्यांच्यासोबत खेळायचे आहे, त्याला पाकिस्तानात खेळताना पाहायचे आहे.'

6 / 8

एकूणच शाहिद आफ्रिदीने अख्तर-शमी यांच्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यासोबतच त्याने मोहम्मद शमीला पाकिस्तानात खेळताना पाहायचे असल्याचे म्हटले. खरं तर आगामी आशिया चषकाचा थरार पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. मात्र भारतीय खेळाडू पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने याआधीच स्पष्ट केले आहे. ही स्पर्धा तटस्थ खेळवण्याची मागणी बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी केली आहे.

7 / 8

बीसीसीआयच्या या भूमिकेवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लांबलचक पत्रक काढून बीसीसीआवर सडकून टीका केली होती. भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही तर आम्ही भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकू अशी धमकी पीसीबीने दिली आहे. तेव्हा या मुद्द्यावरून मोठा वाद रंगला होता.

8 / 8

मोहम्मद शमी आणि शोएब अख्तर यांच्या वादावर आफ्रिदीने अधिक म्हटले, 'तुम्ही निवृत्त खेळाडू असलात तरी असे करू नये. पण मोहम्मद शमी सध्या संघासोबत खेळत आहे त्यामुळे त्याने या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत.' असा सल्ला आफ्रिदीने शमीला दिला आहे.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२शोएब अख्तरशाहिद अफ्रिदीमोहम्मद शामीभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App