Ramiz Raja "भारताने पाकिस्तानच्या गोलंदाजीची नक्कल केली...", रमीझ राजाचा अजब दावा

ramiz raja on team india: भारतीय संघाने न्यूझीलंडला ट्वेंटी-20 मालिकेत 2-1 ने पराभूत केल्यानंतर पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार रमीझ राजाने एक अजब दावा केला आहे.

भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्धची 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका 2-1 ने जिंकली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने किवी संघाला अखेरच्या सामन्यात तब्बल 168 धावांनी पराभवाची धूळ चारली.

खरं तर काल तिसऱ्या निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडचा संघ संपूर्ण 20 षटके देखील खेळू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी शानदार खेळी करत किवी संघाला 12.1 षटकांत सर्वबाद केले.

भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारतीय फलंदाजांनी शानदार खेळी केली. शुबमन गिलने नाबाद शतक ठोकून न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभारला.

सलामीवीर इशान किशन (1) धाव करून स्वस्तात परतला. त्यानंतर गिल आणि राहुल त्रिपाठीच्या जोडीने डाव सावरला. मात्र, त्रिपाठी आपल्याला अर्धशतकाला मुकला आणि (44) धावा करून बाद झाला.

शुबमन गिल शानदार खेळी करून न्यूझीलंडची डोकेदुखी वाढवत होता. पण इतर भारतीय फलंदाजांना जास्त वेळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. सूर्यकुमार यादव (24) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (30) धावांची खेळी करून तंबूत परतला.

परंतु, सलामीवीर गिलने शानदार खेळी करत आपले शतक पूर्ण केले. त्याने 63 चेंडूत 126 धावांची नाबाद शतकी खेळी केली. गिलच्या या खेळीत 7 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर 234 धावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाने 20 षटकांत 4 बाद 234 धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना किवी संघाला पूर्णपणे अपयश आले.

भारताच्या गोलंदाजांनी देखील शानदार कामगिरी करत मालिकेवर कब्जा केला. 235 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाला घाम फुटला. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ केवळ 66 धावांवर ढेपाळला.

भारताकडून कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांना प्रत्येकी 2-2 बळी घेण्यात यश आले. भारतीय गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा याने एक हास्यास्पद दावा केला आहे.

खरं तर भारताच्या शानदार विजयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष रमीझ राजा खूप प्रभावित झाला आहे. पण त्याने एक अजब दावा करताना म्हटले की, भारतीय संघाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची कॉपी करून तयारी केली आहे.

रमीझ राजाने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, "मला अनेकदा असे वाटते की भारताने पाकिस्तानकडे पाहिले आणि त्यांच्या गोलंदाजीची रचना त्याच पद्धतीने केली. उमरान मलिककडे हारिस रौफसारखा पेस आहे, अर्शदीप सिंगनेही शाहीन आफ्रिदीसारखी गोलंदाजी केली आहे."

"वसीम ज्युनियरप्रमाणे हार्दिक पांड्या देखील मधल्या फळीतील षटके टाकतो. यासोबतच दोघांचा वेगही सारखाच आहे. शिवम मावी सहाय्यक गोलंदाजाच्या भूमिकेत आहे. भारताची फिरकी गोलंदाजी पाकिस्तानपेक्षा थोडी चांगली आहे. मी जेव्हा जेव्हा दोन्ही बाजूंचा खेळ पाहतो तेव्हा मला नेहमी वाटते की पाकिस्तानला काहीतरी सुधारण्याची गरज आहे", असे त्याने अधिक म्हटले.