Gautam Gambhir: "IPL जिंकण्यापेक्षा विश्वचषक जिंकणे खूप महत्त्वाचे आहे", गौतम गंभीरने भारतीय खेळाडूंचे टोचले कान

world cup 2023 india: आयसीसीचा 2023चा वन डे विश्वचषक भारतात होणार आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 2011 मध्ये आयसीसी वन डे विश्वचषक जिंकला. ज्यामध्ये भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीरची या विजयात मोलाची भूमिका राहिली होती.

मात्र, 2011 पासून भारताला आजतागायत ट्वेंटी-20 आणि वन डे विश्वचषक जिंकता आलेला नाही. यावर भाष्य करताना गौतम गंभीरने भारतीय संघाच्या काही चुकांवर भाष्य केले असून विश्वचषक जिंकण्यासाठी मूळ खेळाडूंनी एकत्र खेळायला हवे असे त्याने म्हटले आहे.

2011 च्या विश्वचषकानंतर धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 2013 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला होता. मात्र, त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता. याशिवाय 2014 ट्वेंटी-20 विश्वचषक फायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या अंतिम सामन्यात देखील भारताचा पराभव झाला.

वर्कलोड मॅनेज न करणे ही सर्वात मोठी चूक असल्याचे गंभीरने म्हटले आहे. स्टार स्पोर्ट्सच्या रोड टू वर्ल्ड कप शोमध्ये बोलताना गंभीरने 2023 च्या आयसीसी वन डे विश्वचषकासाठी भारताच्या तयारीवरून ही प्रतिक्रिया दिला.

"जेव्हाही आपण नवीन गोष्टींबद्दल किंवा दृष्टिकोनाबद्दल बोलतो, तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मूळ खेळाडूंना ओळखावे लागते. त्यामुळे त्यांना एकाही वन डे सामन्यातून वगळू नये. जर त्यांना थकवा जाणवला तर त्याने ट्वेंटी-20 मधून विश्रांती घ्यावी परंतु वन डे सामन्यांमधून विश्रांती घेऊ नये."

गंभीरने आणखी म्हटले, "माझ्या मते मागील दोन विश्वचषकात भारतीय संघाचा ज्या प्रकारे पराभव झाला. त्यात सर्वात मोठी चूक म्हणजे वर्कलोडमुळे सर्व खेळाडूंनी एकत्र पुरेसे क्रिकेट खेळले नाही. सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन किती वेळा एकत्र खेळली हे मला आठवत नाही."

"थेट विश्वचषकादरम्यान आम्ही आमची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आणि तीही सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन नव्हती", अशा शब्दांत गंभीरने बीसीसीआयवर निशाणा साधला.

खरं तर वर्कलोड हाताळण्यासाठी अनेकवेळा वरिष्ठ खेळाडूंना विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर विश्रांती दिली जाते. यावर टीका करताना गंभीर पुढे म्हणाला की, "तिन्ही फॉरमॅट खेळणाऱ्या खेळाडूला ब्रेक घ्यायचा असेल तर तो ट्वेंटी-20 किंवा आयपीएलमधूनही ब्रेक घेऊ शकतो."

"खेळाडूने ब्रेक घेतल्याने आयपीएल फ्रँचायझीचे नुकसान होत असेल तर त्याची काळजी करू नये. पुढील वर्षी पुन्हा आयपीएल येणार आहे. पण विश्वचषक चार वर्षांतून एकदाच होतो. त्यामुळे मला वाटते की आयपीएल जिंकण्यापेक्षा विश्वचषक जिंकण्यात अधिक काही आहे."

एकूणच आयपीएल जिंकण्यापेक्षा विश्वचषक जिंकणे अधिक महत्त्वाचे असल्याचे गंभीरने म्हटले आहे. गंभीरच्या म्हणण्यानुसार आयपीएल दरवर्षी येत असते पण विश्वचषक 4 वर्षांतून होत असतो त्यामुळे यावर अधिक भर दिला पाहिजे.

याशिवाय विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंना पूर्वतयारीसाठी एकत्र खेळण्याची संधी द्यायला हवी असे देखील गौतम गंभीरने म्हटले.