दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघाचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस सध्या मॅझन्सी सुपर लीगमध्ये खेळत आहे. पार्ल रॉक्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. त्याच्या संघानं शनिवारी नेल्सन मंडेला बे जायंट्स संघावर 12 धावांनी विजय मिळवला.
या विजयासह पार्ल रॉक्स संघानं गुणतालिकेत 10 सामन्यांत 6 विजयांसह 27 गुणांची कमाई करताना अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आणि अंतिम फेरीतील स्थानही पक्कं केलं.
या सामन्यात फॅफनं संघातील प्रमुख खेळाडू हार्डस विलजोनला बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला होता. हार्डस हा फॅफच्या बहिणीचा पती आहे.
या सामन्यात नाणेफेकीला आलेल्या फॅफला संघातील बदलाबद्दल विचारले. त्यावर त्यानं हार्डसला संघाबाहेर बसवल्याचे सांगितले. त्यानं सांगितले की,'हार्ड्स व माझ्या बहिणीचं काल लग्न झालं आणि तो तिच्यासोबत बेडवर झोपला आहे.' फॅफच्या या उत्तरानंतर अँकरलाही हसू आवरले नाही.
विलजोन आणि फॅफची बहीण रेमी ऱ्हानर्स हे वर्षभर एकमेकांना डेट करत आहेत आणि शनिवारी त्यांचा विवाह झाला. त्यामुळे तो सामन्यात खेळू शकला नाही.
विलजोन हा ट्वेंटी-20 लीगमधील स्टार खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं केवळ एक कसोटी सामना खेळला आहे आणि तोही 2016मध्ये इंग्लंडविरुद्ध.
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणार आहे.
विलजोनकडे 113 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा अनुभव आहे. त्यात त्यानं 2099 धावा, तर 438 विकेट्स घेतल्या आहेत. 92 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 127 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 125 सामन्यांत 140 विकेट्स घेतल्या आहेत.