सचिन तेंडुलकरची गणना भारतच नव्हे तर जगातील महान फलंदाजांमध्ये होते. त्याने असे अनेक विश्वविक्रम केले आहेत, जे मोडणे जवळजवळ अशक्य आहे. आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल, पण क्रिकेट जगतात असे ४ विक्रम आहेत, जे सचिन तेंडुलकरलाही आपल्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मोडता आलेले नाहीत. तर जाणून घेऊयात, कोणते आहेत हे महाविक्रम जे सचिनलाही मोडणे शक्य झाले नाही.
- टेस्ट क्रिकेट मध्ये 99.94 ची सरासरी - सचिन तेंडुलकरने त्यांच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत ५३.७९ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या आहेत. मात्र त्याला ऑस्ट्रेलियाचे डोनाल्ड ब्रॅडमन (Don Bradman) यांचा कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीचा विक्रम मोडता आला नाही. डोनाल्ड ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये ६९९६ धावा केल्या आहेत. यात त्यांच्या फलंदाजीची सरासरी ९९.९४ एवढी होती, जी क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक आहे. केवळ सचिन तेंडुलकरच नाही तर जगातील कोणताही फलंदाज हा महान विक्रम मोडता आला नाही. डोनाल्ड ब्रॅडमन यांनी त्यांच्या आयुष्यात केवळ ५२ कसोटी सामने खेळले आहेत.
- कसोटी क्रिकटमध्ये 400 धावांचा विश्वविक्रम - सचिन तेंडुलकरला त्यांच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत वैयक्तिक ४०० धावांची खेली कधीही करता आलेली नाही. सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २४८ धावांची खेळी केली आहे. महत्वाचे म्हणजे, त्याला त्याच्या कसोटी कारकिर्दीत त्रिशतकही ठोकता आलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नावे आहे. त्याने २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध अँटिग्वा कसोटी सामन्यात नाबाद ४०० धावा फटकावल्या होत्या. त्याचा हा विश्वविक्रम गेल्या २१ वर्षांत अद्याप कुणालाही मोडता आलेला नाही.
- टेस्ट क्रिकेटमध्ये 12 द्विशतके - सचिन तेंडुलकरला कसोटी क्रिकेटमध्ये १२ द्विशतकांचा विश्वविक्रमही मोडता आलेला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १२ द्विशतकांचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ६ द्विशतके ठोकली आहेत.
- 6 बॉल 6 सिक्सर - खरे तर सचिन तेंडुलकर षटकार ठोकण्याच्या बाबतीत माहीर होत. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग ६ चेंडूत ६ षटकार मारण्याचा पराक्रम त्याला करता आलेला नाही. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केवळ युवराज सिंगलाच शक्य झाली आहे. त्याने सलग ६ चेंडूत ६ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध युवराज सिंगने सलग ६ चेंडूंवर ६ षटकार ठोकले होते. सचिन तेंडुलकरला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही सलग ६ चेंडूत ६ षटकार ठोकता आलेले नाहीत.