इंग्लंडचा पराभव करण्यामागे त्यांच्याच एका माजी खेळाडूचा मोठा वाटा; नेमकं कनेक्शन काय, पाहा

ENG Vs AFG 2023:क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात अफगाणिस्तानने पहिल्यांदाच इंग्लंडला नमवले.

फलंदाजांनी आव्हानात्मक मजल मारून दिल्यानंतर अफगाणिस्तानने गोलंदाजांच्या दमदार मान्याच्या जोरावर गतविश्वविजेत्या इंग्लंडला ६९ धावांनी नमवले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील हा पहिला धक्कादायक विजय ठरला.

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात अफगाणिस्तानने पहिल्यांदाच इंग्लंडला नमवले. अफगाणिस्तानचा डाव ४९.५ षटकांत २८४ धावांत संपुष्टात आला. यानंतर अफगाणिस्तानने इंग्लंडला ४०.३ षटकांत २१५ धावांमध्ये गुंडाळले.

धावांचा पाठलाग करताना अडखळती सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडची २१च्या षटकात ५ बाद ११७ अशी अवस्था झाली. येथून मिळविलेली पकड अफगाणिस्तानने अखेरपर्यंत कायम राखली. मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी ३, तर मोहम्मद नबीने २ बळी घेत इंग्लंडला धक्का दिला.

इंग्लंडच्या पडझडीत हॅरी ब्रूकने एका बाजूने खंबीरपणे अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांची कामगिरी खूप साधरण राहिली. मात्र क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात अफगाणिस्तानने पहिल्यांदाच इंग्लंडला नमवले.

इंग्लंडचा पराभव करण्यामागे फक्त खेळाडूंचाच वाटा आहे, असे नाही. इंग्लंडच्या माजी खेळाडूाचा अनुभवाचा फायदा देखील अफगाणिस्तान संघाला झाला. जोनाथन ट्रॉट हे सध्या अफगाण संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. जोनाथन ट्रॉट हे इंग्लंडकडून ८ वर्षे (२००७ ते २०१५) क्रिकेट खेळले आहेत. २०११ एकदिवसीय विश्वचषक फक्त भारतातच आयोजित करण्यात आला होता.

ट्रॉटला त्याच्या इंग्लिश संघाचे नियोजन, खेळाडू आणि कर्मचारी यांची चांगली जाणीव आहे. त्याला इंग्लिश खेळाडूंची चांगली समज आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी ट्रॉटच्या अनुभवाचा फायदा घेत इंग्लंडविरुद्ध जोरदार तयारी केली, जी सामन्यात कामी आली. ट्रॉटने दमदार पद्धतीने फिरकीपटूंना सापळा रचला, त्यात इंग्लंडचा संघ अडकला. ट्रॉटने इंग्लंडच्या गोलंदाजांविरुद्ध अफगाणिस्तानच्या फलंदाजांनाही चांगले तयार केले होते.

ट्रॉटने त्या मोसमात इंग्लंडसाठी सर्वाधिक ४२२ धावा केल्या. त्यावेळी त्याची सरासरीही ६०.२८ होती आणि त्याने ५ अर्धशतके झळकावली होती. यावेळीही विश्वचषक भारतात होत आहे. अशा परिस्थितीत ट्रॉटने अफगाणिस्तानला भारतीय खेळपट्ट्यांचा उत्तम अनुभव दिला आणि आपल्याच इंग्लंड संघाचा पराभव केला.

ट्रॉटने एक दिवस आधी पत्रकार परिषदेत इंग्लंड संघाला इशारा दिला होता. तो म्हणाला होता, 'या अफगाण संघात जगातील कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे. आम्ही प्रत्येक सामन्यात जिंकण्याच्या इराद्याने खेळतो आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही जिंकू शकतो. आम्ही सगळे सामने जिंकतोच असे नाही. बांगलादेशकडून झालेल्या पराभवामुळे आम्ही निराश झालो आहोत. तो म्हणाला, 'आम्ही यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यातील कामगिरी निराशाजनक होती. सातत्य ठेवून काम करावे लागेल.