विराट कोहली, MS Dhoni यांची पूजा करणे थांबवा...! गौतम गंभीरच्या विधानाने पुन्हा खळबळ

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) नेहमी त्याच्या विधानामुळे चर्चेत राहतो.

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) नेहमी त्याच्या विधानामुळे चर्चेत राहतो. भाजपा खासदार, क्रिकेट समालोचक असलेला गंभीर याचे महेंद्रसिंग धोनीबद्दल असेलले मत जगजाहीर आहे. त्याने अनेकदा धोनीवर टीकाही केली आहे. आजही तो अशाच एका विधानाने चर्चेत आला आहे.

भारतात क्रिकेट हा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे... क्रिकेट हा एक सणच असतो आणि त्यामुळे क्रिकेटपटूंची क्रेझ ही प्रचंड आहे. कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे अनेकांचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांची व्यक्ती पूजाही अनेक चाहते करतात. पण, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने त्याच व्यक्ती पूजेवरून निशाणा साधला आहे. त्याने सोशल मीडिया, फॅन्स व ब्रॉडकास्टर यांना या मुद्यावरून झापले आहे.

देशातील लोकांची क्रिकेट क्रेझ पाहता अनेकांसाठी क्रिकेटपटू हे देवासारखे आहेत. त्यांना गंभीरने स्पष्ट संदेश दिला आहे. तो म्हणाला, '' भारतीय क्रिकेट हे अग्रस्थानी असायला हवं आणि भारतीय क्रिकेटचीच पूजा व्हायला हवी. भारतीयांनी या व्यक्ती प्रेमातून बाहेर पडायला हवं. मग ते भारतीय क्रिकेटमध्ये असो, राजकारणात असो, दिल्ली क्रिकेटपटू असो... व्यक्ती पूजा थांबवली गेली पाहिजे. भारतीय क्रिकेटचीच पूजा व्हायला हवी.''

''खर सांगायचं तर खेळाडू त्यांचं काम करत असतात... धोनी, कोहली आणि अन्य काही खेळाडूंनी स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. भारतीय क्रिकेटसाठी आणि वैयक्तिक स्तरावर त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. सोशल मीडियावर सध्या रोल मॉडेलची वेगळीच संकल्पना तयार होतेय आणि त्याचा खूप अतिरेक केला जातोय. खेळाडूंना हिरोचा दर्जा दिला जातोय,''यावरही गंभीरने लक्ष वेधले.

सोशल मीडिया व ब्रॉडकास्टर अशा व्यक्ती पूजेला अधिक खतपाणी घातलं आहे. गंभीर पुढे म्हणाला,''व्यक्ती पूजा कोणी निर्माण केली? सोशल मीडियावरील फॉलोअर्स जी भारतील सर्वात खोटी गोष्ट आणि ब्रॉडकास्टर यांच्यामुळे हे व्यक्ती पूजेचे प्रमाण वाढलं... १९८३च्या वर्ल्ड कपनंतर कपिल देव ब्रँड झाले, त्यानंतर २००७ व २०११च्या वर्ल्ड कपनंतर धोनी ब्रँड झाला... खेळाडू हे करत नाही किंवा बीसीसीआयही नाही. २-३ खेळाडू नव्हे तर भारतीय क्रिकेटच्या यशात ड्रेसिंग रुममध्ये असलेल्या १५ खेळाडूंचा वाटा असतो.