टीम इंडियात स्थान न मिळाल्याने 'नाराज' पृथ्वीचा IPL मध्ये फ्लॉप शो; ६ मॅचमध्ये केल्या ४७ धावा

सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम म्हणजे काही युवा भारतीय फलंदाजांसाठी अग्निपरीक्षाच आहे. कारण या मोठ्या व्यासपीठावर चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

या युवा खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांसह आणखी काही शिलेदारांचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड शानदार फॉर्ममध्ये आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ची बॅट अद्याप शांत आहे.

पृथ्वीच्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले असून केवळ १ सामना जिंकला आहे. लक्षणीय बाब म्हणजे पृथ्वी शॉचा चालू हंगामात फ्लॉप शो सुरूच आहे. त्याने ६ सामन्यांत एकूण केवळ ४७ धावा केल्या आहेत.

खरं तर सहा सामन्यांची धावसंख्या एकत्र करून देखील शॉचे अर्धशतक पूर्ण होत नाही. भारतीय संघात स्थान न मिळाल्याने आगपाखड करणारा पृथ्वी आता खराब फॉर्मचा सामना करत आहे. श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संधी न मिळाल्याने पृथ्वीने सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती.

या वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत पृथ्वीला संघात स्थान मिळाले. पण कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला एकाही सामम्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले नव्हते.

पृथ्वी शॉ आयपीएल २०२३ मध्ये एकाही सामन्यात २० हून अधिक धावा करू शकला नाही. यंदाच्या हंगामात त्याची सर्वोत्तम धावसंख्या केवळ १५ आहे, जी त्याने मुंबई इंडियन्सविरूद्ध घरच्या मैदानावर केली होती.

पृथ्वीने ६ सामन्यात केवळ ४७ धावा केल्याने त्याच्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्या खराब फॉर्मचा संघाला देखील फटका बसत असून सहकारी डेव्हिड वॉर्नरवर दबाव वाढत आहे. त्यामुळे धिम्या खेळीमुळे कर्णधार वॉर्नरला देखील टीकाकारांचा सामना करावा लागत आहे.

पहिला सामना पृथ्वी शॉने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्याने 12 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध 7 धावा केल्या.

त्यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्ध तो शून्यावर बाद झाला. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 15 धावा केल्या आणि काल कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 13 धावा काढून तो बाद झाला.

पृथ्वी शॉ अशीच कामगिरी करत राहिल्यास त्याला संघात स्थान मिळवणे कठीण होईल. तो बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. नुकताच न्यूझीलंडविरुद्धच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.