पाकिस्तानचा क्रिकेटपटू सलमान आगाच्या नावावर एका वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा २६ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.
सलमान आगाने यावर्षी एकूण ५४ सामने खेळले आहेत, ज्यात ५ कसोटी, १७ एकदिवसीय आणि ३२ टी-२० चा समावेश आहे. एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही खेळाडूने खेळलेले हे सर्वाधिक सामने आहेत.
राहुल द्रविडने १९९९ मध्ये एकूण ५३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यावर्षी राहुल द्रविडने १० कसोटी आणि ४३ एकदिवसीय सामने खेळले. पुढच्या वर्षी, २००० मध्ये, पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफने तेवढेच सामने खेळून द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली.
या यादीत माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे, त्याने २००७ मध्ये एकूण ५३ सामने खेळले आहेत. यावर्षीच धोनीला टी-२० विश्वचषकाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा विश्वचषक जिंकला.
१९९७ मध्ये एका वर्षात ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा टप्पा गाठणारा सचिन तेंडुलकर पहिला खेळाडू होता. त्यावर्षी सचिनने १२ कसोटी आणि ३९ एकदिवसीय सामन्यांसह एकूण ५१ सामने खेळले.