जिथं ICC ची स्पर्धा तिथं शमीचा जलवा! वर्ल्ड रेकॉर्ड सेट करताना अनेक विक्रमांना लावला सुरुंग

शमी नुसता फिट नाही तर हिट है बॉस!

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमीनं आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. या सामन्यात पाच विकेट्स घेत शमीनं अनेक विक्रम आपल्या नावे केले.

आयसीसीच्या वनडे स्पर्धेत पाचव्यांदा मोहम्मद शमीनं पाच विकेट्स घेतल्या. क्रिकेट जगतातील अन्य कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

आयसीसी वनडे स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही आता शमीच्या नावे झाला आहे. शमीनं १९ डावात ६० विकेट्स घेत झहीर खानचा विक्रम मागे टाकला. याआधी झहीर खानने ३२ डावात ५९ विकेट्स घेतल्याचा विक्रम होता.

शमी पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताकडून मैदानात उतरला आहे. पदार्पणाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाच विकेट्स घेणारा तो क्रिकेट जगतातील दुसरा गोलंदाज आहे. याआधी जोश हेजलवूडनं अशी कामगिरी करून दाखवली होती. हेजलवूडनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पदार्पणात ६ विकेट्स घेतल्या होत्या.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी दोन्ही स्पर्धेत पाच विकेट घेणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज आहे.

वनडेत सर्वात जलगतीने २०० विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. स्टार्क पाठोपाठ तो या यादीत आता दुसऱ्या स्थानावर आहे. स्टार्कनं १०२ डावात तर शमीनं १०३ डावात हा पल्ला गाठला आहे.

कमी डावात वनडेत २०० विकेट्स घेण्याचा विक्रम हा स्टार्कच्या नावे असला तरी सर्वात कमी चेंडूत २०० विकेट्स घेण्याचा विक्रम मात्र मोहम्मद शमीच्या नावे झालाय. वनडेत २०० विकेट्सचा पल्ला गाठण्यासाठी शमीनं ५२२६ चेंडू फेकले. स्टार्कनं यासाठी ५२ ४० चेंडू टाकले होते.

मोहम्मद शमी हा आयसीसीच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी ओळखला जातो. पण त्याला अजून स्पर्धेत चॅम्पियनचा टॅग लागलेला नाही. याबाबतीत मात्र तो अनलकी ठरला आहे. यावेळी हा टॅग पुसला जाणार का? ते पाहण्याजोगे असेल.