IND vs NZ ODI: "हरलो पण याच्यातून खूप काही शिकण्याची संधी मिळेल", शिखर धवनने सांगितलं 'पराभवा'चं कारण

सध्या न्यूझीलंडच्या धरतीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगला आहे. यजमान संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेचा थरार रंगला आहे. आज या मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथे पार पडला. पहिल्याच सामन्यात यजमान संघाने मोठा विजय मिळवून भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद ३०६ धावा केल्या होत्या. ज्याचा पाठलाग किवी संघाने केवळ ४७.१ षटकांत पूर्ण केला.

तत्पुर्वी, न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाने शानदार सुरूवात केली होती. कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी पहिल्या बळीसाठी १२४ धावांची भागीदारी नोंदवली. गिल ६५ चेंडूत ५० धावांवर असताना लॉकी फर्ग्युसनने त्याला तंबूत पाठवले. तर शिखर धवन ७२ धावांवर बाद झाला, त्याला टीम साऊदीने बाहेरचा रस्ता दाखवला.

त्यानंतर श्रेयस अय्यरने भारताच्या फलंदाजीची जबाबदारी सांभाळली. अय्यरने ७६ चेंडूत ८० धावांची ताबडतोब खेळी करून धावसंख्या ३०० पार पोहचवण्यात मोलाची भूमिका पार पाडली. याव्यतिरिक्त कोणत्याच भारतीय खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. रिषभ पंत (१५), सूर्यकुमार यादव (४), संजू सॅमसन (३६) आणि वॉशिंग्टन सुंदर (३७) धावांवर नाबाद राहिला.

न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन आणि टीम साऊदी यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर ॲडम मिल्नेला एक बळी घेण्यात यश आले. भारतीय संघाने यजमान संघासमोर ३०७ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाची सुरूवात निराशाजनक झाली.

न्यूझीलंडच्या संघाचे सलामीवीर फिन अॅलेन (२२) आणि डेव्होन कॉन्वे (२४) धावा करून स्वस्तात माघारी परतले. मात्र त्यानंतर कर्णधार केन विलियमसनने फलंदाजीची धुरा सांभाळली. त्याला टॉम लॅथमने शानदार साथ दिली. विलियमसन सावध खेळी करून डाव पुढे नेत होता तर लॅथम मोठे फटके मारून भारतीय संघाच्या अडचणीत वाढ करत होता.

कर्णधार केन विलियमसनने ९८ चेंडूत ९४ धावांची नाबाद खेळी केली. तर टॉम लॅथमने १०४ चेंडूत १४५ धावांची ताबडतोब शतकी खेळी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. केन- टॉम यांची भागीदारी तोडण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले आणि किवी संघाने विजयी सलामी दिली. अखेर न्यूझीलंडने ४७.१ षटकांत ३ बाद ३०९ धावा केल्या आणि सामना आपल्या नावावर केला.

भारतीय गोलंदाज बळी घेण्यासाठी अखेरपर्यंत तडफडत राहिल्याचे पाहायला मिळाले. भारताकडून पदार्पण करणाऱ्या उमरान मलिकने १० षटकांत ६६ धावा देत दोन बळी घेतले. फिरकीपटू युझवेंद्रला एकही बळी घेण्यात यश आले नाही. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी केली मात्र तोही बळी घेऊ शकला नाही. त्याने १० षटकात ४२ धावा दिल्या. तर शार्दुल ठाकूरला १ बळी घेण्यात यश आले.

सामन्यानंतर भारतीय कर्णधार शिखर धवन म्हणाला, "आम्हाला वाटले की ३०७ धावांचे लक्ष्य चांगले आहे. पहिल्या १०-१५ षटकांमध्ये चेंडू स्विंग होत होता. हे मैदान इतर मैदानांपेक्षा थोडे वेगळे आहे, याचाच फायदा घेत लॅथमने आक्रमक फलंदाजी केली. क्षेत्ररक्षणातही आमच्याकडून काही चुका झाल्या. मी आधी म्हटल्याप्रमाणे लॅथमने सामना आमच्यापासून हिरावून घेतला. त्याने ४०व्या षटकात चार चौकार मारून सामना फिरवाल. या पराभवातून आम्हाला नक्कीच खूप काही शिकण्याची संधी मिळेल."

या विजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनच्या चेहऱ्यावरील हास्य बोलके होते. विजयावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, "लक्ष्य आव्हानात्मक होते. जर तुम्ही मोठी भागीदारी केली तर तुम्ही या मैदानावर कोणतेही लक्ष्य साध्य करू शकता. टॉम लॅथमने अविस्मरणीय खेळी खेळली. माझ्या दृष्टीने ही वनडेतील सर्वात खास खेळी आहे. आज फिरकी गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली."