वन डे विश्वचषकातील १० मोठे उलटफेर; बांगलादेशने भारतासह इंग्लंडचाही केला होता पराभव

Biggest Upsets In History Of ICC ODI World Cups : वन डे विश्वचषकाच्या इतिहासात अनेकदा मोठे उलटफेर पाहायला मिळाले. बांगलादेशसारख्या संघाने बलाढ्य इंग्लंड आणि भारताला पराभूत करून जगाचे लक्ष वेधले होते. चला तर मग जाणून घेऊया विश्वचषकातील १० मोठे उलटफेर.

क्रिकेटमध्ये कधी कोणता चमत्कार होईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. बांगलादेशने २०११ च्या विश्वचषकात इंग्लंडचा धक्कादायक पराभव करत मोठा उलटफेर केला होता. बांगलादेशने इंग्लिश संघाला २२५ धावांवर रोखले आणि ३ गडी राखून लक्ष्याचा पाठलाग केला.

२०१५ च्या विश्वचषकात देखील बांगलादेशने इंग्लिश संघाला पराभवाची धूळ चारली होती. महमुदुल्लाहचे शानदार शतक आणि रुबेल हुसैनची अप्रतिम गोलंदाजी या जोरावर बांगलादेशने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला होता.

२०२३ च्या विश्वचषकात अफगाणिस्तानने गतविजेत्या इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव केला. राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेऊन इंग्लिश संघाचा ६९ धावांनी पराभव केला.

१९९२च्या विश्वचषकात इंग्लंडला झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला होता. झिम्बाब्वेला १३४ धावांत रोखूनही इंग्लंडची फलंदाजी कोलमडली आणि बलाढ्य इंग्लंडला ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

२०११ च्या विश्वचषकात आयर्लंडने इंग्लंडने दिलेल्या ३२८ धावांच्या लक्ष्याचा यसस्वी पाठलाग केला. केव्हिन ओब्रायनने एक ऐतिहासिक खेळी करून आयर्लंडला तीन गडी राखून विजय मिळवून दिला होता.

विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात उल्लेखनीय उलटफेर म्हणजे भारताने दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिजचा ४३ धावांनी पराभव करून ट्रॉफी आपल्या नावावर केली. १८३ धावांच्या माफक धावसंख्येचा बचाव करताना भारताने वेस्ट इंडिजला अवघ्या १४० धावांत गुंडाळले.

झिम्बाब्वेने १९८३च्या विश्वचषकात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी धक्कादायक पराभव केला होता.

२००७च्या वन डे विश्वचषकात आयर्लंडने पाकिस्तानचा धुव्वा उडवून विजय साकारला होता. पाकिस्तानला १३२ धावांवर रोखून नवख्या संघाने विजयावर शिक्कामोर्तब केला.

२००७च्या विश्वचषकातील आठवणी भारतीयांच्या मनात आजतागायत ताज्या आहेत. बांगलादेशने जगाला धक्का देत भारताचा दारूण पराभव केला होता. बांगलादेशने दिलेल्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सर्वबाद केवळ १६१ धावा करता आल्या होत्या.

केनियाने १९९६ मध्ये वेस्ट इंडिजवर ७३ धावांनी विजय मिळवून खळबळ उडवून दिली होती. केनियाचा फिरकीपटू मॉरिस ओडुंबेने केवळ १५ धावांत तीन बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.