Join us

जीवापाड प्रेम केलेला खेळच जीवावर बेतला! क्रिकेटच्या मैदानातील १० दुर्देवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:37 IST

Open in App
1 / 10

मेलबर्न येथे नेटमध्ये सराव करत असताना चेंडू लागल्यामुळे युवा क्रिकेटरनं आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली. १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बेन ऑस्टिन हेल्मट घालून सराव करत करत होता. पण स्वयंचलित बॉलिंग मशीनमधून निघालेला एक वेगवान चेंडू त्याच्या मानेवर लागला अन् गंभीर दुखापतीनंतर तातडीने रुग्णालयात दाखल करूनही त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.

2 / 10

फिल ह्यूजेस या ऑस्ट्रेलियन सलामीवीराला २५ नोव्हेंबर २०१४ रोजी, सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान, शॉन अ‍ॅबॉटचा बाउन्सर मानेवर लागला होता. चेंडू लागल्यावर तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु तो बरा होऊ शकला नाही. दोन दिवसांनी ह्यूजेसचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

3 / 10

डॅरिन रँडल या दक्षिण आफ्रिकेच्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटूची पुल शॉट मारताना झालेली दुखापत जीवघेणी ठरली होती. २७ ऑक्टोबर २-१० मध्ये दक्षिण आफ्रिकेतील प्रीमियर लीग सामन्यादरम्यान चेंडू लागून डोक्याला दुखापत झाल्यावर तो मैदानातच बेशुद्ध पडला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टर त्याला वाचवू शकले नव्हते.

4 / 10

झुल्फिकार भट्टी हा पाकिस्तानचा क्लब क्रिकेटपटू होता. पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना बाउन्सर चेंडू छातीवर आदळल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना डिसेंबर २०१३ मध्ये घडली, जेव्हा तो फक्त २२ वर्षांचा होता.

5 / 10

पाकिस्तानी माजी क्रिकेटर आणि समालोचक रमीझ राजा याचा भाऊ वसीम राजा या क्रिकेटपटूनंही क्रिकेटच्या मैदानातील दुर्देवी घटनेत जीव गमावल्याची घटना घडली होती. ऑगस्ट २००६ मध्ये इंग्लंडमध्ये सरेच्या संघाकडून खेळताना मैदानावर हृदयविकाराच्या झटक्याने या क्रिकेटरचे निधन झाले होते.

6 / 10

अंकित केशरी हा बंगाल अंडर-१९ चा माजी कर्णधार आणि एक उत्तम सलामीवीर फलंदाज होता. २०१५ मध्ये नॉकआउट सामन्यादरम्यान मैदानात तो आपल्या झेल घेण्याचा प्रयत्न करताना तो आपल्या सहकारी खेळाडूला धडकला. यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. तीन दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याने अखेरचा श्वास घेतला.

7 / 10

भारतीय क्रिकेटपटू रमन लांबा याला ढाका येथे झालेल्या क्लब सामन्यादरम्यान हेल्मेटशिवाय क्षेत्ररक्षण करताना डोक्याला चेंडू लागून गंभीर दुखापत झाली होती. मेंदूला दुखापत झाल्यामुळे तो कोमात गेला. तीन दिवसांनी २३ फेब्रुवारी १९९८ रोजी त्याचे दुर्दैवीरित्या निधन झाले. १९८६ ते १९८९ दरम्यान त्याने भारतासाठी ४ कसोटी सामने आणि ३२ एकदिवसीय सामने खेळले होते.

8 / 10

अब्दुल अझीझ हा पाकिस्तानी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होता. तो कधीकधी यष्टीरक्षक म्हणूनही खेळायचा. १७ जानेवारी १९५९ रोजी कराची येथे झालेल्या सामन्यादरम्यान त्याच्या छातीवर चेंडू लागला. हा क्रिकेटर मैदानावरच कोसळला आणि रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

9 / 10

इयान फॉली या इंग्लिश क्रिकेटपटूचेही मैदानात खेळताना झालेल्या दुखापतीनंतर निधन झाले होते. १९९३ मध्ये व्हाईटहेवन क्रिकेट क्लबकडून मैदानात उतरलेल्या फॉली याला वर्किंग्टन विरुद्ध फलंदाजी करताना डोळ्याखाली चेंडू लागला होता. दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल केल्यावर शस्त्रक्रियेदरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. मैदानावरील दुखापत आणि वैद्यकीय समस्या असा दुर्मिळ प्रसंगात क्रिकेटरनं जीव गमावला.

10 / 10

विल्फ स्लॅक हा मिडलसेक्सकडून खेळणारा काउंटी क्रिकेटपटू होता. १९८९ मध्ये, गांबियामध्ये सामना खेळत असताना, तो अचानक कोसळला आणि फलंदाजी करताना त्याच्या आयुष्याच्या खेळीला ब्रेक लागला. त्याच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्ड