BCCI: रिषभपासून ते सूर्यकुमारपर्यंत! BCCI ने 2022 मधील सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूंची नावे केली जाहीर

Flashback 2022: बीसीसीआयने 2022 मधील सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

2022 या इंग्रजी वर्षाच्या अखेरच्या दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सरत्या वर्षीच्या खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाकडून सर्वोत्कृष्ट खेळी करणाऱ्या शिलेदारांची नावे जाहीर केली आहेत.

बीसीसीआयने कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज म्हणून रिषभ पंतची निवड केली आहे. पंतने 2022 या वर्षात 7 कसोटी सामने खेळले असून एकूण 680 धावा केल्या आहेत. त्याने 61.81च्या सरासरीने शानदार खेळी केली आहे. त्याची 2022 या वर्षातील सर्वोत्तम धावसंख्या 146 आहे.

कसोटी क्रिकेटमधील 2022या वर्षातील सर्वोत्तम भारतीय गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहला बीसीसीआयने पसंती दिली आहे. बुमराहने 5 सामन्यांत 22 बळी घेतले आहेत. यादरम्यान त्याने 2 सामन्यांत 5-5 बळी घेण्याची किमया साधली.

वन डे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून घोषित करण्यात आले. अय्यरने 2022 या वर्षात 724 धावा केल्या असून त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 113 अशी राहिली आहे.

वन डे क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने 2022 या वर्षात उल्लेखणीय कामगिरी केली. त्याने या फॉरमॅटमध्ये 15 सामन्यांत 24 बळी पटकावले आहेत.

सूर्यकुमार यादवला ट्वेंटी-20 फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आले. सूर्यकुमारने 31 सामन्यांत 1164 धावा करून सर्वांचे लक्ष वेधले. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या 117 अशी राहिली.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारने 2022 या वर्षात शानदार कामगिरी केली. भुवनेश्वर कुमारला ट्वेंटी-20 विश्वचषक तसेच विविध द्विपक्षीय मालिकांमध्ये प्रभावी कामगिरीसह सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरवण्यात आले. त्याने सरत्या वर्षात 32 सामन्यांत 37 बळी घेतले आहेत.