बांगलादेशकडून ऑस्ट्रेलियाचा मानहानीकारक पराभव, कांगारूंच्या नावे नोंदवला गेला १४४ वर्षांतील लाजिरवाणा विक्रम

Bangladesh vs Australia T20 Updates: बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑस्ट्रेलियावर ही मालिका १-४ अशा मोठ्या फरकाने गमावण्याची नामुष्की ओढवली आहे.

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काल झालेल्या मालिकेतील पाचव्या सामन्यात १२३ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या ६२ धावांत गारद झाला. त्यामुळे त्यांना सामन्यात ६० धावांनी पराभूत व्हावे लागले. तर मालिका १-४ अशा मोठ्या फरकाने गमावण्याची नामुष्की ओढवली.

ऑस्ट्रेलियाकडून केवळ दोन फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला. यामध्ये मॅथ्यू वेडने २२ आणि बेन मॅकडरमॉटने १७ धावा काढल्या. म्हणजेच संघाच्या एकूण ६२ धावांपैकी ३९ धावा या दोघांनीच काढल्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने भेदक गोलंदाजी करताना ९ धावांत चार बळी टिपले. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या मालिकेतील खराब खेळामुळे ऑस्ट्रेलियाच्या नावावर अनेक लाजिरवाणे विक्रम नोंदवले गेले.

गेल्या काही काळात ऑस्ट्रेलियन संघाला सलग पाच टी-२० मालिकांमध्ये पराभूत व्हावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाला इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशने पराभूत केले आहे. गेल्या २१ टी-२० पैकी सहा सामन्यातच ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला आहे. तर आव्हानाचा पाठलाग करताना गेल्या दहा पैकी केवळ एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळाला आहे. हा विजयसुद्धा बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या सामन्यात मिळाला होता. त्यावेळी १०४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने तीन विकेट्स राखून विजय मिळवला होता.

बांगलादेशविरुद्धच्या या पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला केवळ ५१३ धावाच जमवता आल्या. पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत कुठल्याही संघाने बनवलेल्या या सर्वात कमी धावा आहेत. तसेच या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने सरासरी १३.५० धावांनंतर एक विकेट गमावली. ही बाब ऑस्ट्रेलियन संघाने किती वाईट फलंदाजी केली हे दाखवण्यासाठी पुरेशी आहे.

६२ धावा ही ऑस्ट्रेलियाची टी-२० मधील सर्वात लहान धावसंख्या आहे. यापूर्वी २००५ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ ७९ धावांत गारद झाला होता. तसेच १३.४ षटकांत डाव आटोपल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात लहान डाव ठरला आहे. १४४ वर्षांच्या इतिहासात ऑस्ट्रेलियन संघ हा एवढ्या कमी धावांत ऑल आऊट झालेला नाही. पुरुषांच्या टी-२० मधील पूर्णवेळ सदस्यांच्या कामगिरीची विचार केल्यास सर्वात कमी धावांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन संघ चौथ्या स्थानी आहे. वेस्ट इंडिज (४५ धावा) पहिल्या, न्यूझीलंड (६० धावा) दुसऱ्या आणि वेस्ट इंडिज (६० धावा) तिसऱ्या स्थानी आहे.

या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या नावावर अनेक लाजिरवाणे विक्रम झाले असते तरी बांगलादेशने मात्र जबरदस्त कामगिरी करत अनेक विक्रम नोंदवले. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरोधात पहिल्यांदाच एखादी मालिका जिंकली आहे. या मालिकेपूर्वी बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ दोन सामने जिंकले होते. मात्र या मालिकेत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला चारवेळा नमवले. तसेच ऑस्ट्रेलियाला सर्वात कमी धावांत गुंडाळण्याची किमयाही साधली.