Join us  

T20 World Cup 2022: चहर, अक्षरची फिरकी करणार जादू? हे 5 भारतीय खेळाडू खेळणार आपला पहिलाच टी-20 विश्वचषक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 3:05 PM

Open in App
1 / 6

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. ॲडलेड, ब्रिस्बेन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये 45 सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे 9 व 10 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 13 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

2 / 6

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आगामी टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा प्रमुख चेहरा असणार आहे. खरं तर चहल पहिलाच टी-20 विश्वचषक खेळणार आहे. संयुक्त टी-20 फॉर्मेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा चहल या वर्षी त्याचा पहिला विश्वचषक लहान फॉरमॅटमध्ये खेळणार आहे. 2016 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या चहलचा मागील टी-20 विश्वचषकात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आगामी काळात तो आपली छाप सोडणार का हे पाहण्याजोगे असेल.

3 / 6

2014 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा अक्षर पटेलही त्याचा पहिला टी-20 विश्वचषक खेळत आहे. रविंद्र जडेजासारख्या घातक अष्टपैलू खेळाडूच्या उपस्थितीमुळे अक्षर पटेलला नेहमीच पर्यायी खेळाडू म्हणून राहावे लागले आहे. मात्र यंदा रवींद्र जडेजा दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला असताना अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. रवींद्र जडेजाच्या गैरहजेरीत अक्षरकडे भारतीय संघाच्या फिरकीची जबाबदारी असणार आहे.

4 / 6

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. आयपीएलमधील त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे 2021 मध्ये त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आणि आता तो टी-20 संघाचा हिस्सा बनला आहे. दुखापतीमुळे काही काळ संघाबाहेर असलेल्या हर्षल पटेलचे पुनरागमन होताच टी-20 विश्वचषकाच्या संघात निवड करण्यात आली. दुखापतीतून परतल्यानंतर हर्षलची कामगिरी काही खास नसली तरी संघ व्यवस्थापनाने त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास दाखवला आहे.

5 / 6

काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्शदीप सिंगने खूप कमी वेळातच स्वत:ला सिद्ध केले आहे. आपल्या घातक गोलंदाजीमुळे त्याने भारतीय संघात जागा मिळवली. लक्षणीय बाब म्हणजे अर्शदीप सिंग टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज असणार आहे. अर्शदीपने आतापर्यंत 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 19 बळी पटकावले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या विश्वचषकात त्याच्या खांद्यावर गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.

6 / 6

दीपक हुडाने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसऱ्या डावात शतक झळकावून विश्वचषकाच्या संघात जागा मिळवली. मात्र मागील काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी फारशी खास राहिली नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हुडाला एकाही सामन्यात संधी देण्यात आली नव्हती. असे असूनही त्याचा विश्वचषकाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2अक्षर पटेलयुजवेंद्र चहलअर्शदीप सिंगभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App