भारतीय क्रिकेटरला 'गिफ्ट' मिळालेल्या डॉन ब्रॅडमनच्या कॅपचा लिलाव; इतक्या कोटींची लागली बोली

Don Bradman Baggy Green Cap Auction: 'गिफ्ट' मिळालेल्या कॅपचा लिलाव का केला, याचेही कारण आले समोर

महान ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या एका 'बॅगी ग्रीन' टोपीवर विक्रमी बोली लावण्यात आली. ही टोपी ब्रॅडमन यांनी १९४७-४८ मध्ये भारताच्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान भारतीय क्रिकेटपटू श्रीरंगा वासुदेव सोहोनी यांना भेट म्हणून दिली होती.

ही टोपी डॉन ब्रॅडमन यांनी १९४७-४८ च्या कसोटी मालिकेदरम्यान परिधान केली होती. ही मालिका भारताचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिलाच परदेश दौरा होता आणि ब्रॅडमन यांची मायदेशातील शेवटची कसोटी मालिका होती. त्यामुळे हा दौरा दोन्ही देशांसाठी विशेष होता.

भारतीय खेळाडू श्रीरंगा वासुदेव सोहोनी यांना ब्रॅडमन यांनी ही टोपी भेट म्हणून दिली होती. त्यांच्या कुटुंबाने ही मौल्यवान भेट तब्बल ७५ वर्षांपासून अत्यंत जपून ठेवली होती. या टोपीच्या आत ब्रॅडमन आणि सोहोनी या दोघांचीही नावे लिहिलेली आहेत.

सोहोनी यांची अंतिम इच्छा होती की, ही टोपी पुन्हा ऑस्ट्रेलियाला मिळावी. त्यामुळे लॉयड्स ऑक्शन्सने दिलेल्या माहितीनुसार, लिलावानंतर ही टोपी आता ऑस्ट्रेलियातच राहणार असून ती एका मोठ्या संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाईल.

लिलावात या टोपीवर ४.६० लाख ऑस्ट्रेलियन डॉलरची बोली लागली. खरीदार प्रीमियमसह ही अंतिम किंमत सुमारे ३.४० कोटी भारतीय रुपयांवर (५,३५,९०० ऑस्ट्रेलियन डॉलर) पोहोचली. ब्रॅडमन यांच्या कोणत्याही वस्तूसाठी लागलेली ही आजवरची सर्वात मोठी बोली आहे.