कुठे हसू तर कुठे अश्रू! ब्रॉडची निवृत्ती अन् इंग्लिश खेळाडू भावुक; अखेरच्या चेंडूवरही जिंकलं मन

stuart broad : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कसोटी क्रिकेटमधील एक यशस्वी गोलंदाज म्हणून ब्रॉडने आपला ठसा उमटवला.

२००७ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात सिक्सर किंग युवराज सिंगने ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकले होते. तेव्हा ब्रॉड प्रसिद्धीच्या झोतात आला. आपल्या कारकिर्दीच्या सुरूवातीला एवढा मोठा धक्का बसला असताना देखील इंग्लिश खेळाडूने मागे वळून पाहिले नाही अन् ऐतिहासिक कामगिरी केली.

सोमवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲशेस मालिकेतील अखेरच्या सामन्यातील अखेरचा दिवस होता. आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या शेवटच्या चेंडूवर ब्रॉडने बळी पटकावून संघाला विजय मिळवून दिला.

योगायोग असा की, ब्रॉडने बॅट आणि चेंडू दोन्ही माध्यमातून आपला शेवट गोड केला. कारकिर्दीतील शेवटचा चेंडू खेळताना त्याने मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला. तर शेवटचा चेंडू टाकताना ॲलेक्स कॅरीला बाहेरचा रस्ता दाखवला.

सामन्यानंतर इंग्लिश ताफ्यात काही भावनिक क्षण पाहायला मिळाले. ब्रॉडचा सहकारी गोलंदाज जेम्स अॅंडरसन आपल्या सहकाऱ्याचा अखेरचा सामना पाहून भावुक झाला. त्याबद्दल बोलताना अॅंडरसनला अश्रू अनावर झाले.

शेवटच्या सामन्यात आपल्या देशाला विजय मिळवून देऊन मैदानातून परतणे यापेक्षा मोठी बाब ती काय असेल. असाच पराक्रम करण्यात ब्रॉडला यश आले.

चौथ्या दिवसाअखेर पाहुणा ऑस्ट्रेलियन संघ विजयाच्या जवळ होता. पण, इंग्लंडने जोरदार पुनरागमन केले आणि विजय साकारला. चौथ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता १३५ धावा केल्या होत्या, परंतु ३८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूचा संघ ३३४ धावांवर आटोपला.

स्टुअर्ट ब्रॉडने अखेरच्या चेंडूवर ॲलेक्स कॅरीला बाद करून सामना आपल्या संघाच्या नावावर केला. इंग्लंडने अखेरच्या सामन्यात ४९ धावांनी दणदणीत विजय नोंदवला.

ब्रॉडने ९५व्या षटकातील चौथा चेंडू टाकला, तेव्हा २८ धावांवर खेळत असलेल्या ॲलेक्स कॅरीच्या बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोच्या हातात गेला. बेअरस्टोने कोणतीही चूक न करता कॅरीला बाहेरचा रस्ता दाखवला.

आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या चेंडूवर बळी घेताच ब्रॉडने एकच जल्लोष केला. त्याचे कुटुंबीय देखील हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होते.

ब्रॉडने शेवटचा बळी घेताच त्याच्या कुटुंबीयांनी आनंदाने उड्या मारल्या. त्याचे वडील आणि माजी क्रिकेटपटू ख्रिस ब्रॉड यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

ब्रॉडने शेवटच्या सामन्यात ४ बळी घेतले. अशाप्रकारे १६७ सामन्यांत ६०४ बळी घेत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास थांबवला.

इंग्लिश संघाच्या कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ब्रॉडकडे पाहिले जायचे. कसोटी सामन्यांव्यतिरिक्त स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडकडून वन डे आणि ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.

मात्र, ब्रॉड कसोटी क्रिकेटपटू म्हणून खूप यशस्वी ठरला. ब्रॉडने १६७ कसोटी सामन्यांमध्ये ६०४ बळी घेतले आहेत. तर, वन डेमधील १२१ सामन्यांमध्ये १७८ आणि ट्वेंटी-२० मधील ५६ सामन्यांमध्ये ६५ बळी घेण्यात इंग्लिश गोलंदाजाला यश आले.