Join us  

Nepal Team created history: सर्वोत्तम धावसंख्या ते सर्वात मोठा विजय! नेपाळचे एका ट्वेंटी-२०त ८ वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 2:32 PM

Open in App
1 / 8

मंगोलियाविरुद्धच्या लढतीत नेपाळने ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या उभी केली. नेपाळने आज ३ बाद ३१४ धावा कुटल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटम इतिहासातील ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी अफगाणिस्तानने २०१९मध्ये आयर्लंडविरुद्ध ३ बाद २७८ धावा केल्या होत्या.

2 / 8

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मध्ये आतापर्यंत एकाही संघाला ३००+ धावा करता आल्या नव्हत्या. नेपाळने हाही वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. कुशल मल्ला ( ११३), कर्णधार रोहित पौडेल ( ६१) आणि दिपेंद्र सिंग एैरी ( ५२*) यांच्या जोरावर नेपाळने ३ बाद ३१४ धावांचा डोंगर उभा केला.

3 / 8

नेपाळच्या ३१४ धावांचा पाठलाग करताना मंगोलियाचा संघ १३.१ षटकांत ४१ धावांत तंबूत परतला. नेपाळने २७३ धावांनी हा सामना जिंकला. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी २०१९मध्ये झेक प्रजासत्ताकने २५७ धावांनी टर्कीला पराभूत केले होते.

4 / 8

नेपाळचा फलंदाज कुशल मल्लाने ३४ चेंडूंत शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील हे सर्वात जलद शतक ठरले. यापूर्वी डेव्हिड मिलर, रोहित शर्मा आणि झेक प्रजासत्ताकच्या सुदेश विक्रमासेकरा यांच्या नावावर ३५ चेंडूंत शतक झळावण्याचा संयुक्त विक्रम होता.

5 / 8

नेपाळच्या दिपेंद्र सिंग एैरीने ९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने ८ षटकार खेचले आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. यापूर्वी युवराज सिंग, ख्रिस गेल व हझरतुल्लाह झझाई यांनी १२ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. पण, युवराज सिंगचे अर्धशतक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील होते, तर इतरांचे अन्य ट्वेंटी-२० सामन्यात.

6 / 8

दिपेंद्र सिंग एैरीने १० चेंडूंत नाबाद ५२ धावांची खेळी केली आणि त्याचा स्ट्राईक रेट हा ५२० इतका राहिला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये प्रथमच ५००+च्या स्ट्राईक रेटने १० किंवा त्यापेक्षा अधिक चेंडूंवर फटकेबाजी करण्यात आली. २०१६मध्ये झिम्बाब्वेच्या स्थानिक ट्वेंटी-२०त मॅलकॉल्म वॉलरने मटाबेलेलँड टस्कर्स विरुद्ध १० चेंडूंत ४३० च्या स्ट्राईक रेटने धावा कुटलेल्या.

7 / 8

नेपाळने आजच्या सामन्यात एकूण २६ षटकार खेचले आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त एका संघाने एका सामन्यात चोपलेले हे सर्वाधिक षटकार ठरले. यापूर्वी २०१९मध्ये अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध २२ षटकार होते आणि वेस्ट इंडिजनेही त्याचवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २२ षटकार खेचले.

8 / 8

कुशल मल्ला हा १९ वर्ष व २०६ दिवसांचा आहे आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज ठरला. फ्रान्सच्या गुस्ताव्ह मॅकेओनने २०२२ मध्ये हा विक्रम नावावर केला होता.

टॅग्स :आशियाई स्पर्धा २०२३नेपाळटी-20 क्रिकेट