तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?

Asia Cup 2025, Pak Vs UAE: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात झालेल्या लढतीपूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडींचीच आता चर्चा होत आहे.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात झालेल्या लढतीपूर्वी घडलेल्या नाट्यमय घडामोडींचीच आता चर्चा होत आहे. भारताविरुद्ध झालेल्या लढतीत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने हस्तांदोलन करणे टाळल्याचा विषय प्राकिस्तानने प्रतिष्ठेचा केला होता. तसेच या प्रकरणी सामनाधिकारी अडी पायक्राफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती. एवढंच नाही तर आपल्या मागण्या मान्य न झाल्यास स्पर्धेतून माघार घेण्याची धमकीही पाकिस्तानने दिली होती. मात्र जवळपास तासभर चाललेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानचा संघ संयुक्त अरब अमिरातीविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. यादरम्यान, नेमकं काय काय घडलं याचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यावेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीवेळी पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करणं टाळलं होतं. ही बाब प्रतिष्ठेचा विषय करत पीसीबीने १५ सप्टेंबर रोजी आयसीसीला एक ईमेल पाठवला होता. तसेच नाणेफेकीवेळी घडलेल्या घटनेचा उल्लेख करत या घटनेमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा दावा केला होता. तसेच सामनाधिकारी अँडी पायक्राफ्ट यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आयसीसीने या प्रकरणाची त्वरित चौकशी करत अँडी पायक्राफ्ट यांनी कुठल्याही आचारसंहितेचा भंग केला नसल्याचे पीसीबीला सांगितले होते.

त्याबरोबरच आयसीसीने हेही सांगितले की, नाणेफेकीवेळी हस्तांदोलन न करण्याच्यासंदर्भात नकवी यांच्या अध्यक्षतेखालील एसीसीकडून मिळालेल्या सूचनांचे ते पालन करत होते. पायक्राफ्ट यांना तणावपूर्ण परिस्थिती व्यवस्थित हाताळली. तसेच थेट प्रक्षेपणादरम्यान कुठलाही गोंधळ होणार नाही याची खबरदारी घेतली, असेही आयसीसीने स्पष्ट केले. मात्र या उत्तरांनी पीसीबीचं समाधान झालं नाही. उलट अँडी पायक्राफ्ट यांची पुढील सामन्यांमधून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच पायक्राफ यांना न हटवल्यास स्पर्धेतून माघार घेण्याची धमकीही पीसीबीने दिली.

मात्र आयसीसीने पीसीबीच्या या धमकीला केराची टोपली दाखवली. तसेच पायक्राफ्ट यांनी कुठल्याही आचारसंहितेचं उल्लंघन केलं नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. एवढंच नाही तर एखाद्या संघाच्या मागणीवरून अधिकाऱ्यांना बदललं जाणार नाही. असे केल्यास त्यामुळे चुकीचा पायंडा पडू शकतो, असेही आयसीसीने ठणकावून सांगितले.

आयसीसी पीसीबीच्या धमक्यांनी भीक घालत नसल्याचे दिसून आल्यावर आशियाई क्रिकेट परिषदेनेही तशाच मागण्यांसह हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र आयसीसीने आपली भूमिका बदलली नाही. त्यानंतर पीसीबीने नवा डाव टाकण्याच प्रयत्न करताना भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान आणि सामना संपल्यावप आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा दावा केला. तसेच पायक्राफ्ट यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यादरम्यान, अँडी पायक्राफ यांनी पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा आणि व्यवस्थापक नवीद अक्रम चिमा यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीला पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन हेही उपस्थित होते. यावेळी पाकिस्तानी संघाच्या मनात निर्माण झालेल्या गैरसमजांबाबत चर्चा झाली. त्यानंतर पायक्राफ यांनी माफी मागितल्याचा दावा पीसीबीने केला. मात्र पायक्राफ यांनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

या बैठकीचा एक व्हिडीओसुद्धा आता व्हायरल होत आहे. त्याचा आवाज बंद केलेला आहे. यादरम्यान, पाकिस्तानकडून एकूण सहा ईमेल करण्यात आले. खूप चर्चाही झाली. मात्र त्यामुळे फार काही बदल झाला नाही. केवळ पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील सामन्याला तासाभराने उशीर झाला. या सामन्यातही अँडी पायक्राफ हेच सामनाधिकारी होते. तसेच स्पर्धेत पुढेही तेच सामनाधिकारी म्हणून राहतील हेही स्पष्ट झाले.

यादरम्यान, पाकिस्तानी संघाने यूएईसोबतचा सामना खेळण्यासाठी निर्धारित वेळेत स्टेडियममध्ये जाण्यासाठी बसमध्ये न बसण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पीसीबी, आयसीसी आणि एसीसी यांच्यामध्ये काही वेळ सल्लामसलत झाल्यानंतर पाकिस्तानी संघ खेळण्यास तयार झाला. तसेच दोन्ही देशांच्या कर्णधारांसोबत सामनाधिकारी अँडी पायक्राफ्ट हेही तिथे उपस्थित होते.