श्रीलंकेचा वर्ल्ड रेकॉर्ड, पाकिस्तानला धोबीपछाड! असा पराक्रम करणारा जगातील एकमेव संघ

Asia Cup 2023 Sri Lanka vs Bangladesh Live : यजमान श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मध्ये शनिवारी बांगलादेशवर विजय मिळवला. Super 4 च्या आजच्या लढतीत श्रीलंकने २१ धावांनी बांगलादेशला पराभूत केले आणि अंतिम फेरीच्या शर्यतीतून त्यांना बाहेर फेकले.

श्रीलंकेच्या २५८ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशकडून तोवहिक हृदोयने ( ८२ धावा) कडवी झुंज दिली. पण, त्याच्या विकेटनंतर बांगलादेशची गाडी घसरली. बांगलादेशचा संपूर्ण संघ ४८.१ षटकांत २३६ धावांत तंबूत परतला.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी सुपर ४ मध्ये प्रत्येकी १ विजय मिळवून खात्यात २ गुण जमा केले आहेत. यामुळे टीम इंडियावर फायनलसाठी दडपण वाढले आहे, तर सलग दुसऱ्या पराभवामुळे बांगलादेश अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाद झाला आहे. भारताने उद्याचा ( वि. पाकिस्तान) सामना जिंकल्यास त्यांचेही २ गुण होतील आणि फायनलची शर्यत अधिक चुरशीची होईल.

प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेकडून कुसल मेंडिस ( ५०) आणि सदीरा समरविक्रमा ( ९३) यांनी दमदार खेळ केला. पथूम निसंकानेही ४० धावांचे योगदान दिले आणि श्रीलंकेच्या ५० षटकांत ९ बाद २५७ धावा झाल्या. तस्किन अहमदन ( ३-६२), हसन महमूद ( ३-५७) आणि शोरिफूल इस्लाम ( २-४८) यांनी उत्तम गोलंदाजी केली

प्रत्युत्तरात बांगलादेशची सुरुवात काही खास झाली नाही. मुश्फिकर रहिम ( २९) व तोवहीद हृदोय यांनी ७२ धावांची भागीदारी करून डाव सारवला. हृदोयने ९७ चेंडूंत ७ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८२ धावावर बाद झाला अन् बांगलादेशच्या हातून सामना निसटला. महीष थीक्षाणा ( ३-६९), दासून शनाका ( ३-२८) व मथीषा पथिराणा ( ३-५८) यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेचा हा वन डे क्रिकेटमधील सलग १३वा विजय ठरला आणि पाकिस्तान ( १२) व दक्षिण आफ्रिका ( १२) यांचा सलग सामने जिंकण्याचा विक्रम मोडून श्रीलंका दुसऱ्या स्थानी पोहोचला. ऑस्ट्रेलिया सलग २१ विजयांसह अव्वल स्थानावर आहे. पण, सलग १३ सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाला ऑल आऊट करणारा श्रीलंका हा पहिलाच संघ ठरला. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.