Asia Cup: बुमराह, राशीद, ज्युनियर मलिंगा की आणखी कोण... ६ पैकी कोण ठरणार X फॅक्टर?

कोणता गोलंदाज गाजवणार आशिया कप? पाहा तुमच्या आवडत्या खेळाडूचं नाव यादीत आहे का?

आशिया कप वनडे क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघातील कोणकोणते गोलंदाज त्यांच्या संघासाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकतात, अशा महत्त्वाच्या गोलंदाजांबाबत येथे जाणून घेऊया...

जसप्रीत बुमराह (भारत) - जसप्रीत बुमराह हा भारतातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक. त्याची आगळीवेगळी गोलंदाजी धोकादायक ठरते. वेगाव्यतिरिक्त त्याच्याकडे स्विंंगही आहे. बुमराहच्या गोलंदाजीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची लाइन आणि लेंग्थ. तो यॉर्कर्समध्ये तरबेज आहे आणि जगातील कोणत्याही फलंदाजाला बाद करण्यास सक्षम आहे. आता फिरकीला अनुकूल श्रीलंकेच्या खेळपट्ट्यांवर तो किती मारक ठरतो, हे पाहावे लागेल.

राशिद खान (अफगाणिस्तान) - करामती खान म्हणून प्रसिद्ध राशिद खान जगभरातील खेळपट्ट्यांवर खूपच धोकादायक बनला आहे. टॉप स्पिन ते गुगली यात तो माहीर आहे. वेगवेगळ्या प्रकारे ६ चेंडू टाकण्यात तो सक्षम आहे. लाइन आणि लेंग्थसह वेग ही त्याची सर्वात मोठी शस्त्रे आहेत.

मथिशा पाथिराना (श्रीलंका) - आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळून मथिशा पाथिराना हा परिपक्व बनला आहे. लसिथ मलिंगासारखी गोलंदाजी ॲक्शन हे त्याचे सर्वात मोठे हत्यार आहे. त्याला ज्युनियर मलिंगा देखील म्हटले जाते. पाथिरानाचा १४०-१४५ किमी प्रतितास वेगाने येणारा चेंडू कोणत्याही फलंदाजाचे स्टम्प्स उखडून टाकू शकतो. त्याला स्विंंग मिळाल्यास ‘डेथ ओव्हर्स’मध्ये तो सर्वात धोकादायक ठरेल.

शाकिब अल हसन (बांगलादेश) - बांगलादेशचा कर्णधार शाकिब हा डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे आणि तो फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर धोकादायक आहे. ऑफस्पिन आणि व्हेरिएशन हे त्याचे सर्वात मोठे शस्त्र. सोबतीला वादळी फलंदाजी हा त्याचा मोठा गुण. बांगलादेशसाठी नेहमीच तो ‘एक्स फॅक्टर’ बनतो.

नसीम शाह (पाकिस्तान) - नसीम शाह हा वेगवान गोलंदाजांपैकी एक. २०१९ मध्ये वयाच्या १६व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करणारा जगातील सर्वात तरुण कसोटी क्रिकेटपटू ठरला होता. नसीम शाहची गोलंदाजीची शैली प्रभावी आहे. त्याचे चेंडू वेगवान आणि धारदार असतात. स्विंग असेल तर तो आणखी धोकादायक ठरतो. हारिस रौफ आणि शाहीन आफ्रिदी हे या संघाचे वेगवान हत्यार आहेत.

संदीप लामिछाने (नेपाळ) - संदीप लामिछाने हा नेपाळमधील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो लेगस्पिन गोलंदाज आहे. त्याने लहान वयातच आपल्या प्रतिभेने जगाला प्रभावित केले आहे. लामिछानेने वन डेत १११ विकेट घेतल्या आहेत. हा गोलंदाज नेपाळसाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकतो.