Asia Cup 2022 : India vs Pakistan मालिकेबाबतचा प्रश्न, रोहित शर्माचं रोखठोक उत्तर; म्हणाला, BCCI अन् सरकार ठरवते, माझ्याकडे ऑप्शन असते तर...

Asia Cup 2022 IND vs PAK Rohit Sharma PRESS Conference : आशिया चषक स्पर्धेचे आठवे जेतेपद पटकावण्यासाठी टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली आहे. भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. विराट कोहलीच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या सामन्यापूर्वी रोहित शर्माने पत्रकार परिषदेत भारतीय संघासंबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. पण, जेव्हा त्याला India vs Pakistan यांच्यातल्या मालिकेबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने 'रोखठोक' उत्तर दिले.

रोहितने मागच्या वर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानकडून झालेला पराभव हा भूतकाळ असल्याचे स्पष्ट करताना बाबर आजम अँड कंपनीला इशारा दिला. तो म्हणाला,''प्रतिस्पर्धीचा जास्त विचार करण्यापेक्षा मैदानावर १०० टक्के योगदान देण्यावर आमचा प्रयत्न असेल. पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल याचा निर्णय घेतलेला नाही. श्रीलंका व अफगाणिस्तान यांचा सामना याच मैदानावर होत आहे. हा सामना कसा रंगतो हे आम्हाला पाहयचे आहे आणि त्यावरच आम्ही प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेऊ.''

शुक्रवारी आम्ही खेळपट्टी पाहिली आणि त्यावर थोडसं गवत दिसत आहे. त्यामुळे अंदाज बांधणे अवघड आहे. प्रत्येक संघात क्वालिटी आहे. त्यामुळे या स्पर्धेत फिरकीपटू वर्चस्व गाजवतील की नाही, याची आम्हाला कल्पना नाही. पाकिस्तानच्या संघात शाहिन आफ्रिदी नाही, तर आमच्याकडे जसप्रीत बुमराह नाही. पण, अन्य खेळाडू त्यांच्या संधीचं सोनं करतील. ही नवी स्पर्धा आहे आणि प्रत्येकजण १०० टक्के देण्यासाठी आतूर आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळणे हे आव्हानात्मक असेल, यात शंका नाही.

याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक घेतील. विराट कोहलीचं विचारात असाल तर त्याने नेट्समध्ये दमदार फलंदाजी केलीय. त्याने फलंदाजीत फार प्रयोग केलेले नाहीत. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर तो मैदानावर उतरला आहे आणि तो फ्रेश दिसतोय. तो प्रचंड मेहनत घेतोय. भारत-पाकिस्तानची दुष्मनी एकीकडे, पण हा सामना चांगला रंगेल. तुम्ही बाहेरून याची वातावरण निर्मिती करा आणि मैदानावर दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो.

संघात चांगले खेळाडू आहेत, परंतु प्रत्येकाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करताना रोहित म्हणाला,''कोण एक खेळला तर दुसऱ्याला बाहेर बसावे लागेल. प्लेइंग इलेव्हन निवडताना आमची डोकेदुखी वाढतेय, कारण सर्वच चांगले खेळाडू आहेत. पण, प्रत्येकाला या स्पर्धेत संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल.''

दोन्ही देशांमधील तणाव लक्षात घेता भारत-पाकिस्तान यांच्यात मालिका खेळवली जात नाही. याबाबत रोहितला विचारले असता तो म्हणाला,''जर माझ्याकडे ऑप्शन असतं तर मी या प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं असतं. बोर्ड आणि सरकार याबाबत निर्णय घेते, आमच्या हातात तर काही नाही. आम्हाला सांगितले जाते या देशाविरुद्ध खेळायचे आहे, तर आम्ही तिथे पोहोचतो. पुढेची यापेक्षा वेगळं काही होणार नाही. जिथे खेळायला पाठवतील, तिथे आम्ही जाऊ. हा अवघड प्रश्न आहे, परंतु बोर्डाने निर्णय घेतल्यास आम्ही खेळू, आम्हाला काहीच समस्या नाही.''

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंह, आवेश खान.