Records : अर्शदीप सिंगने इतिहास रचला, १९९३ नंतर भारताच्या जलदगती गोलंदजांचा करिष्मा

India vs South Africa 1st ODI Live Update : भारताच्या जलदगती गोलंदाजांनी आज कमाल केली. अर्शदीप सिंग ( ५-३७) व आवेश खान ( ४-२७) यांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिका भेदरले. त्यांचा संपूर्ण संघ २७.३ षटकांत ११६ धावांत तंबूत परतला. अँडिले फेहलुकवायो ( ३३) आणि टॉनी डे झॉर्जी ( २८) यांनी चांगला खेळ केला.

दक्षिण आफ्रिकेचा संघ ११६ धावांवर ऑल आऊट झाला आणि घरच्या मैदानावरील वन डे क्रिकेटमधील ही त्यांची निचांक कामगिरी ठरली. २०१८ मध्ये सेंच्युरियन येथे भारताविरुद्धच ते ११८ धावांवर ऑल आऊट झाले होते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या जलदगती गोलंदाजांनी आज सर्वाधिक ९ विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंगने ५ व आवेश खानने ४ बळी टिपले. यापूर्वी १९९३ मध्ये मोहाली व २०१३ मध्ये सेंच्युरियन येथे भारतीय जलदगती गोलंदाजांनी ८ विकेट्स घेतल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये एका इनिंग्जमध्ये ५ विकेट्स घेणारा अर्शदीप सिंग हा भारताचा पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी १९९९ मध्ये सुनील जोशी ( ५-६) नैरोबी, युझवेंद्र चहल ( ५-२२, सेंच्युरियन, २०१८ ) आणि रवींद्र जडेजा ( ५-३३, कोलकाता, २०२३) यांनी असा पराक्रम केला होत, परंतु हे तिघेही फिरकीपटू आहेत.

वन डे क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात भारतीय गोलंदाजांनी सर्वाधिक ८ वेळा ५ विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. २०२३ मध्ये मोहम्मद शमी ( ४), मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव व अर्शदीप सिंग ( प्रत्येकी १) यांनी हा पराक्रम केला. १९९८, १९९९ व २००५ या कॅलेंडर वर्षात केवळ ४ वेळा भारतीय गोलंदाजांना डावात पाच विकेट्स घेता आल्या होत्या.

भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी इनिंग्जमध्ये डावात पहिल्यांचा ५ विकेट्स घेण्याच्या स्टुअर्ट बिन्नीच्या ( ३ इनिंग्ज) विक्रमाशी अर्शदीपने आज बरोबरी केली. विशेष म्हणजे त्याने त्याच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांत विकेटही घेतलेली नाही. संजीव शर्मा ( ७), अर्शद आयुब ( १२) व एस श्रीसंथ ( १३) यांना अर्शदीपने आज मागे टाकले.

भारताकडून वन डे क्रिकेटमधील डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाची ही चौथी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. आशिष नेहराने २००३ व २००५ मध्ये अनुक्रमे इंग्लंड ( ६-२३) व श्रीलंका ( ६-५९) यांच्याविरुद्ध चांगला मारा केला होता. इरफान पठाणने २००५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.