Arjun Tendulkar: 'मंकडिंग' मी करणार नाही, पण कुणी केलं तर त्याला सपोर्ट नक्की करेन; अर्जुन तेंडुलकर

arjun tendulkar news: अर्जुन तेंडुलकरने मंकडिंगबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर याने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. अशातच अर्जुन वादग्रस्त राहिलेल्या मंकडिंगबाबत आपली भूमिका जाहीर करून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अर्जुन तेंडुलकर नॉन-स्ट्रायकर्स एंड मोडवर धावबाद करण्याच्या बाजूने आहे. अर्थात जर कोणी मंकडिंग केले तर मी नक्कीच पाठिंबा देईन असे त्याने म्हटले आहे. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2022 मध्ये 'अनफेअर प्ले' विभागातून मंकडिंग हा शब्द काढून टाकला आहे.

आयपीएलमध्ये रविचंद्रन अश्विनने जोस बटलरला या पद्धतीने धावबाद केल्यानंतर हा वाद चिघळला होता. यानंतर भारतीय महिला संघाच्या दीप्ती शर्माने देखील इंग्लंडच्या धरतीवर इंग्लिश खेळाडूला मंकडिंग पद्धतीने बाद केले होते.

अनेकवेळा ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला जागेवर राहण्यास सांगितले आहे. मंकडिंगच्या या मुद्द्यांवरून क्रिकेट वर्तुळात विविध मतभेद आहेत.

बऱ्याच माजी खेळाडूंनी नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला मंकडिंग करून बाद करण्यास विरोध केला होता. कारण यासाठी गोलंदाजाच्या कोणत्याही कौशल्याची आवश्यकता नसते.

"मी पूर्णपणे मंकडिंगच्या बाजूने आहे, ते कायद्यात आहे. जे लोक म्हणतात की हे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध आहे त्यांच्या या विधानाशी मी असहमत आहे", असे अर्जुन तेंडुलकरने सांगितले.

"मी वैयक्तिकरित्या ते करणार नाही कारण मी माझा रनअप मध्येच थांबवू शकत नाही. त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील आणि मी त्यात माझी उर्जा वाया घालवणार नाही. पण जर कोणी ते केले तर मी त्याच्या नक्कीच बाजूने आहे", असे अर्जुनने क्रिकेट नेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

अलीकडेच भारत आणि श्रीलंका यांच्यात वन डे मालिका पार पडली. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात रोहितच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली. खरं तर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका 98 धावांवर खेळत होता. तेव्हा मोहम्मद शमीने मंकडिंग पद्धतीने स्टंम्प उडवून अपील केली.

अम्पायर नितिन मेनन यांनी तिसऱ्या अम्पायरचा सिग्नल दिला, परंतु रोहित पळत आला अन् अपील मागे घेतले. त्यानंतर रजिथाने एक धाव घेत शनाकाला स्ट्राईक दिली अन् श्रीलंकेच्या कर्णधाराने शतक पूर्ण केले. रोहितच्या या कृतीने मात्र चाहत्यांचे मन जिंकले. ''शनाका 98 धावांवर होता आणि अशा प्रकारे त्याने बाद होऊ नये अशी आमची इच्छा होती. त्यामुळे अपील मागे घेतली,'' असे रोहित म्हणाला.

बीग बॅश लीगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झाम्पाने देखील या पद्धतीने धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, झाम्पाने त्याच्या गोलंदाजीची ॲक्शन पूर्ण केल्यानंतर धावबाद केल्यामुळे फलंदाजाला बाद घोषित केले नाही.