Join us  

ऋतुराजशिवाय इतर भारतीय खेळाडूही चमकले; पहिल्यांदाच एका वर्षात 3 जणांनी ठोकले द्विशतक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 2:56 PM

Open in App
1 / 8

ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्कृष्ट कामगिरी करून दुहेरी शतक झळकावले. महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार ऋतुराजने नाबाद 220 धावा केल्या. यादरम्यान त्याने एका षटकात 7 षटकार मारले. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एका षटकात 7 षटकार मारणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

2 / 8

159 चेंडूत 220 धावा करून ऋतुराज गायकवाड नाबाद राहिला. त्याच्या या अविस्मरणीय खेळीत 10 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता. त्याने उत्तर प्रदेशच्या संघाचा लेफ्ट आर्म स्पिनर शिवा सिंगच्या एका षटकात 7 षटकार ठोकले. यादरम्यान गोलंदाजाने एक नो बॉल टाकला होता. अशा प्रकारे एकाच षटकात 43 धावा झाल्या. लिस्ट-ए क्रिकेटमधील हे सर्वात महागडे षटक ठरले आहे.

3 / 8

ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त या वर्षी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एन जगदीशन आणि समर्थ व्यास यांनी देखील दुहेरी शतके झळकावली आहेत. खरं तर भारतीय फलंदाजांनी एका वर्षात 3 द्विशतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी फक्त 2 वेळा 2-2 द्विशतके झाली होती. लक्षणीय बाब म्हणजे 2022च्या वर्षात एन जगदीशन, समर्थ व्यास आणि ऋतुराज गायकवाड या भारतीय खेळाडूंनी दुहेरी शतक केले आहे.

4 / 8

तामिळनाडूच्या संघाचा नारायण जगदीशनने 21 नोव्हेंबर रोजी अरुणाचल प्रदेशविरुद्ध 141 चेंडूत 277 धावा केल्या होत्या. लिस्ट-ए क्रिकेटमधील कोणत्याही फलंदाजाची ही सर्वात मोठी खेळी आहे. त्याने 25 चौकार आणि 15 षटकार मारले होते. त्या सामन्यात तामिळनाडूच्या संघाने 2 बाद तब्बल 506 धावा केल्या होत्या. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये प्रथमच कोणत्या संघाने 500 धावांचा आकडा गाठला होता.

5 / 8

सौराष्ट्रच्या संघाचा सलामीवीर समर्थ व्यासने 13 नोव्हेंबर 2022 रोजी विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात मणिपूरविरुद्ध 200 धावांची आक्रमक खेळी केली होती. त्याने 131 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये 20 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. यामुळे संघाला 282 धावांनी मोठा विजय मिळाला.

6 / 8

भारताकडून लिस्ट-ए क्रिकेटबद्दल भाष्य करायचे झाले तर, एकूण 11 फलंदाजांनी दुहेरी शतक झळकावण्याची किमया साधली आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा 3 द्विशतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. ही सर्व शतके रोहितने वनडे क्रिकेटमध्ये झळकावली आहेत. रोहितने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली होती. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 आणि श्रीलंकेविरुद्ध नाबाद 208 धावा केल्या होत्या.

7 / 8

इतर भारतीयांबद्दल बोलायचे तर, शिखर धवनने दक्षिण आफ्रिकेच्या अ संघाविरुद्ध 248, पृथ्वी शॉने पुद्दुचेरीविरुद्ध नाबाद 227, वीरेंद्र सेहवागने एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 219, संजू सॅमसनने गोव्याविरुद्ध नाबाद 212, यशस्वी जैस्वालने झारखंडविरुद्ध 230 धावा केल्या होत्या. तर कौशलने सिक्कीमविरुद्ध २०२ आणि सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेमध्ये नाबाद २०० धावा केल्या आहेत.

8 / 8

सचिन तेंडुलकर भारताकडून दुहेरी शतक झळकावणारा पहिला फलंदाज आहे. आता या यादीत ऋतुराज गायकवाड याचाही समावेश झाला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी अनेक दिग्गज ऋतुराजकडे सलामीवीर म्हणून पाहत आहेत. मात्र मराठमोळा ऋतुराज सध्या भारतीय संघातून बाहेर आहे.

टॅग्स :विजय हजारे करंडकऋतुराज गायकवाडरोहित शर्माशिखर धवनसचिन तेंडुलकर
Open in App