IND vs NZ: 'शतकवीर' शुबमन गिलचे किंग कोहलीकडून विशेष कौतुक; एक मोठं विधान करून जिंकली मनं

virat kohli on shubman gill: शतकवीर शुबमन गिलचे विराट कोहलीने विशेष कौतुक केले आहे.

भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्धची 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका 2-1 ने जिंकली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने किवी संघाला अखेरच्या सामन्यात तब्बल 168 धावांनी पराभवाची धूळ चारली.

खरं तर काल झालेल्या निर्णायक ट्वेंटी-20 सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडचा संघ संपूर्ण 20 षटके देखील खेळू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी शानदार खेळी करत किवी संघाला 12.1 षटकांत सर्वबाद केले.

भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारतीय फलंदाजांनी शानदार खेळी केली. शुबमन गिलने नाबाद शतक ठोकून न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभारला.

सलामीवीर इशान किशन (1) धाव करून स्वस्तात परतला. त्यानंतर गिल आणि राहुल त्रिपाठीच्या जोडीने डाव सावरला. मात्र, त्रिपाठी आपल्याला अर्धशतकाला मुकला आणि (44) धावा करून बाद झाला.

शुबमन गिल शानदार खेळी करून न्यूझीलंडची डोकेदुखी वाढवत होता. पण इतर भारतीय फलंदाजांना जास्त वेळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. सूर्यकुमार यादव (24) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (30) धावांची खेळी करून तंबूत परतला.

परंतु, सलामीवीर गिलने शानदार खेळी करत आपले शतक पूर्ण केले. त्याने 63 चेंडूत 126 धावांची नाबाद शतकी खेळी केली. गिलच्या या खेळीत 7 षटकार आणि 12 चौकारांचा समावेश होता.

शुबमनच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 234 धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना किवी संघाला पूर्णपणे अपयश आले.

गिलच्या या शानदार खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशातच भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने एक मोठे विधान करत युवा खेळाडूची पाठ थोपटली आहे.

किंग कोहलीने इस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून म्हटले, "सितारा, भविष्य इथे आहे. @shubmangill." भारतीय संघाचे भविष्य इथे असल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे.

235 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघाला घाम फुटला. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ केवळ 66 धावांवर ढेपाळला.

डेरी मिचेल (35) व्यतिरिक्त कोणत्याच न्यूझीलंडच्या फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. डेरी मिचेल (35) आणि मिचेल सॅंटनर (13) यांना वगळले तर एकाही किवी फलंदाजाला धावांचा दुहेरी आकडा गाठता आला नाही.

भारताकडून कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांना प्रत्येकी 2-2 बळी घेण्यात यश आले.