४२५ धावा, १४ षटकार, ५३ चौकार! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त धावांची त्सुनामी, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाचे शतक

वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघाने २ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २१३ धावांचे विक्रमी लक्ष्य पार करून इतिहास रचला. कर्णधार हेली मॅथ्यूजच्या १३२ धावांच्या खेळीमुळे वेस्ट इंडिज संघाने करिष्मा केला. तिने ६४ चेंडूत २० चौकार आणि ५ षटकार मारले. यासह वेस्ट इंडिजने महिला टी-२० क्रिकेटचे सर्वात मोठे लक्ष्य गाठले.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना एलिस पेरी (७०) आणि फोबी लिचफिल्ड (५२) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सहा विकेट्स गमावून २१२ धावा केल्या होत्या. या सामन्यात एकूण ४२५ धावा झाल्या, ३ अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं गेलं. सिडनीमध्ये झालेल्या सामन्यात १४ षटकार आणि ५३ चौकार मारले होते.

वेस्ट इंडिजला २१३ धावांचे लक्ष्य मिळाले. याआधी महिला ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. त्यांनी २०१८ मध्ये मुंबईत १९९चे लक्ष्य गाठले होते. महिला T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाठलाग करताना 200 पेक्षा जास्त धावा करणारा वेस्ट इंडिज हा पहिला संघ आहे.

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज महिला संघांमध्ये झालेल्या सामन्यात एकूण ४२५ धावा झाल्या. महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच एका सामन्यात ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी २०१८ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात ३९७ धावा झाल्या होत्या.

वेस्ट इंडिजने तीन विकेट्सवर २१३ धावा केल्या. यासह त्यांनी महिला ट्वेंटी-२०आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच २०० धावांचा टप्पा पार केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथमच एखाद्या संघाने २००च्या वर धावा केल्या आहेत.

१३२ धावांच्या खेळीसह, हेली मॅथ्यूजने आता महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. तिने २०१०च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ११२ धावा करणाऱ्या डिआंड्रा डॉटिनचा विक्रम मोडला.

हेली मॅथ्यूज आता महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. तिच्या आधी हा विक्रम इंग्लंडच्या डॅनी व्हॅटच्या नावावर होता, तिने २०१८ मध्ये भारताविरुद्ध १२४ धावा केल्या होत्या. १३२ धावांसह, मॅथ्यूज महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सहाव्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली.

२०१६ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या फायनलनंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडिजने महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. त्यांना १४ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. एकूण ३२ सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडिजकडून तिसऱ्यांदा पराभूत झाला आहे.