स्वप्नपूर्तीला १२ वर्षे पूर्ण! आजच्याच दिवशी भारत झाला होता 'जगज्जेता', पाहा सुवर्णक्षणांची झलक

WC 2011 FINAL : भारतीय संघाने वन डे विश्वचषक उंचावल्याला आज बरोबर १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.

 - Marathi News | ICC World Cup 2011 Final | Latest cricket Photos at Lokmat.com

भारतीय संघाने शेवटच्या वेळी वन डे विश्वचषक उंचावल्याला आज बरोबर १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला अंतिम सामना आणि ते सुवर्णक्षण आजही भारतीयांच्या मनात ताजे आहेत. २ एप्रिल २०११ च्या दिवशी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकून इतिहास रचला.

कॅप्टन कूल धोनीने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. १२ वर्षांपूर्वी भारताने विश्वचषक जिंकला मात्र त्यानंतर अद्याप भारताला एकदाही हा किताब पटकावता आला नाही. २८ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर भारतीयांना जगज्जेता झाल्याचे सुख मिळाले होते.

महेंद्रसिंग धोनीने षटकार मारताच भारताने विश्वचषकाचा दुष्काळ संपवून जगज्जेता होण्याचे स्वप्न साकार केले. श्रीलंकेविरूद्धच्या फायनलच्या सामन्यात भारताने लंकेला ६ गडी राखून पराभवाची धूळ चारली.

श्रीलंकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महेला जयवर्धनेच्या शतकी खेळीच्या जोरावर २७४ धावांचा डोंगर उभारला होता. भारताला हे आव्हान त्यावेळी कठीण वाटू लागले जेव्हा ७ षटकांत सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही जोडी तंबूत परतली होती.

मात्र, यानंतर गौतम गंभीरने विराट कोहलीसोबत डाव पुढ नेला आणि तिसऱ्या बळीसाठी ८३ धावांची भागीदारी नोंदवली. पण तिलकरत्ने दिलशानने विराट कोहलीचा अप्रतिम झेल घेऊन भारताला मोठा धक्का दिला.

तेव्हा युवराज सिंगवर सर्वांच्या नजरा टिकून होत्या. पण कॅप्टन कूल धोनीने खेळपट्टीवर एन्ट्री घेतली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण त्या विश्वचषकात सिक्सर किंग युवराज सिंग शानदार फॉर्ममध्ये होता.

धोनीने मधल्या फळीत गौतम गंभीरसोबत डाव सावरला आणि पाचव्या बळीसाठी १०९ धावांची महत्तपूर्ण भागीदारी केली. गंभीर ९७ धावा करून बाद झाला. मात्र, धोनीने अखेरपर्यंत खेळपट्टीचा ताबा सोडला नाही आणि ४९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

युवराज सिंग २१ धावा करून नाबाद परतला. सामना झाल्यानंतर धोनीने म्हटले होते, "मी श्रीलेकंच्या गोलंदाजांना ओळखून होतो. कारण ते चेन्नईच्या संघाचे देखील सदस्य होते. मी युवराजच्या आधी यासाठी फलंदाजीला आलो कारण समोर मुरलीधरन गोलंदाजी करत होता. मी त्याच्या फिरकीचा खूप सराव केला होता. म्हणून मला विश्वास होता की मी त्याचा सामना करू शकेन आणि सहजपणे धावा काढू शकेन."

तर याबाबत युवराज सिंगने म्हटले होते, "२०११ च्या विश्वचषकात माझ्या आधी माहीने फलंदाजीला जावे हा संघाचा निर्णय होता. जेव्हा गौतम गंभीर आणि विराट कोहली खेळपट्टीवर टिकून होते. तेव्हा ड्रेसिंगरूममध्ये याबाबत चर्चा सुरू होती."

"वीरू, सचिन, गॅरी कस्टर्न आणि माही यांच्यात चर्चा झाल्यानंतर हे निश्चित झाले की, मधल्या काही षटकांमध्ये लेफ्ट-राइट कॉम्बिनेशनची गरज पडेल. कारण तेव्हा श्रीलंकेचे २ फिरकीपटू गोलंदाजी करत असतील. त्यामुळे तेव्हा ठरले की एक बळी पडताच पाचव्या क्रमांकावर माही फलंदाजीसाठी जाईल", असे युवीने सांगितले होते.