नवी दिल्ली : इंग्लंडच्या तुलनेत अझहर अली याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ कैकपटींनी सरस असून पहिल्या सामन्यातील पराभवानंतरही हा संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका जिंकू शकतो, असा विश्वास माजी कर्र्णधार इंझमाम उल हक याने व्यक्त केला आहे.
पहिल्या कसोटीत ओल्ड ट्रॅफोर्र्डवर पाकची स्थिती भक्कम होती, तथापि ख्रिस वोक्स आणि जोस बटलर यांनी त्यांच्या आशेवर पाणी फेरत इंग्लंडला तीन गडी राखून विजय मिळवून दिला. पाकसाठी १२० कसोटीत ८,८३० आणि ३७८ वन डेत ११,७३९ धावा काढणारा ५० वर्षांचा इंझमाम पुढे म्हणाला, ‘विजयाच्या स्थितीत असलेल्या संघाला पराभूत होताना पाहणे निराशादायी होते.
दुसऱ्या कसोटीत मात्र आमचा संघ मुसंडी मारेल, असा विश्वास आहे. पाक संघ इंग्लंडच्या तुलनेत सरस असून आम्हाला पहिली कसोटी जिंकायला हवी होती, तथापि पाक अद्यापही मालिका जिंकू शकतो, असे मला वाटते.’
पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी मिळविणाºया पाकचा दुसरा डाव १६९ धावात कोसळला होता. इंझमामने खेळाडूंना प्रेरणा देत राहणे हे व्यवस्थापनाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. दुसरी कसोटी साऊथम्पटन येथे १३ आॅगस्टपासून खेळली जाईल. (वृत्तसंस्था)