नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे (बीसीसीआय) सीईओ राहुल जोहरी यांना प्रशासकांच्या समितीने (सीओए) नेमलेल्या तीन सदस्यांच्या चौकशी समितीने लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून‘क्लीन चिट’दिली आहे. समितीने तक्रारकर्त्या दोन्ही महिलांचे आरोप फेटाळत ‘कपोलकल्पित’ असे संबोधले.
टिष्ट्वटरवरुन राहुल जोहरी आणि पीडित महिलेचे ई-मेलवरील संभाषण जाहीर करण्यात आल्यानंतर बीसीसीआयमध्ये मोठी खळबळ माजली होती. राहुल जोहरी बीसीसीआयमध्ये कार्यरत नसताना हे प्रकरण घडल्याचा महिलेने दावा केला होता. यानंतर सीओएने जोहरी यांची चौकशी करुन त्यांना याप्रकरणी निर्दोष मुक्त केले . शिवाय जोहरी यांना बीसीसीआयचे सीईओ म्हणून काम करण्यासही परवानगी देण्यात आल्याचे समजते. वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.
हे प्रकरण समोर आल्यानंतर सीओएने जोहरी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यांना क्लीन चिट देण्याचा निर्णय हा प्रशासकीय समितीने एकमताने घेतला नव्हता. विनोद राय व डायना एडुलजी यांच्यात या प्रकरणावरुन मतभिन्नता होती, असे कळते. समिती प्रमुख विनोद राय यांनी जोहरी यांना कामावर रुजू होण्यास काहीच हरकत नसल्याचे मत व्यक्त केले.
जोहरी यांच्यावरील आरोप हे बिनबुडाचे असून, चौकशीदरम्यान एकही आरोप सिद्ध झालेला नाही. जोहरी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे आरोप करण्यात आले असा निष्कर्ष चौकशी समितीच्या समोर आला आहे. जोहरी हे चौकशी समितीपुढे आलेले अंतिम व्यक्ती होते.