सिलहट : झिम्बाब्वे संघाने चार वर्षांनंतर पुन्हा एकदा कसोटी सामना जिंकला. त्यांनी बुधवारी बांगलादेशला चौथ्या दिवशी तीन गड्यांनी नमवत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. झिम्बाब्वेने याआधी मार्च २०२१ला अफगाणिस्तानला नमवले होते. १७४ धावांचा यशस्वी पाठलाग हादेखील झिम्बाब्वे संघासाठी एक नवा विक्रम ठरला. विजयी लक्ष्य गाठताना झिम्बाब्वेचे फलंदाज ब्रायन बेनेट आणि बेन करन यांनी ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. बेनेटने ५४, तर करनने ४४ धावा जोडल्या.
मधल्या फळीने संघर्ष केला. ३० धावांची आवश्यकता असताना झिम्बाब्वेने ७ धावांत आणखी ३ फलंदाज गमावले. रिचर्ड नगारावा-वेस्ली माधेव्हेरे यांनी मात्र विजय खेचून आणला. झिम्बाब्वेने वेस्ट इंडिज, आयर्लंड, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघांविरुद्ध १० कसोटी सामने खेळले. परंतु, त्यांना एकही विजय मिळाला नाही. त्यांनी ८ सामने गमावले आणि २ सामने बरोबरीत राहिले.