भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू आणि IPL मधील सर्वात यशस्वी गोलंदाज युझवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयुष्यातील चढ-उतारानंतर यंदाचा हंगाम गाजवण्यासाठी त्याने फिटनेसवर फोकस केला आहे. यासाठी वाईट सवयी सोडल्याचा मोठा खुलासा या अनुभवी गोलंदाजाने केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एबी डिव्हिलियर्ससोबत मनमोकळ्या गप्पा
आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामाआधी युझवेंद्र चहलनं दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांच्या यूट्यूब पॉडकास्टमध्ये आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासंदर्भातील अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
दिनेश-दीपिकाला कन्यारत्न! क्रिकेटरनं खास पोस्टच्या माध्यमातून शेअर केली 'गूडन्यूज'
फिटनेस फर्स्ट! बरबाद करणारा नाद सोडला
एबी डिव्हिलियर्ससोबत गप्पा गोष्टी करताना चहल म्हणाला की, गेल्या सहा महिन्यांपासून मद्यपान पूर्णपणे बंद केले आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी करिअर क्रिकेटच्या मैदानात टिकायचे असेल तर फिटनेस हीच सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरते. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून संघासाठी १५० टक्के योगदान द्यायचे आहे. तरुण खेळाडूंनी माझ्याकडून सकारात्मक गोष्टी शिकाव्यात, अशी इच्छा आहे. या कठोर निर्णयातून चहल आपल्या गोलंदाजीची धार कायम ठेवण्याच्या निर्धारात असल्याचे स्पष्ट होते.
कठीण काळातून सावरण्याची तयारी
गेल्या काही वर्षांत चहल फिल्डसह फिल्डबाहेरील नकारात्मक गोष्टीमुळेच चर्चेत राहिला. वैयक्तिक आयुष्यात धनश्री वर्मासोबतचा घटस्फोट असो वा २०२३ पासून भारतीय संघाबाहेर राहण्याची आलेली वेळ या घटना त्याला धक्क्यावर धक्का देणाऱ्या ठरल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज होण्याची त्याच्याकडे संधी होती. पण खात्यात ९६ विकेट्स असताना तो संघाबाहेर पडला.
पंजाबसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो युझी
मागील हंगामात चहलने १४ सामन्यांत १६ विकेट्स घेत पंजाब किंग्सला ११ वर्षांनंतर प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र संघ अंतिम फेरीत पराभूत झाला. २००८पासून आजपर्यंत आयपीएल ट्रॉफी न जिंकलेल्या जुन्या संघांमध्ये पंजाबसह आणि दिल्ली कॅपिटल्सचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ अधिक मजबूत दिसत आहे. २८ मार्चपासून यंदाच्या हंगामाची सुरुवात होणार असून ३१ मार्चला पंजाब किंग्सचा संघ गुजरात टायटन्स विरुद्धच्या लढतीनं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. नवा ध्यास आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या जोरावर चहल पंजाबच्या संघाला चॅम्पियन करण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.