T20I World Cup 2024 - भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याची ICC ने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. १ जूनपासून सुरू होणाऱ्या T20 World Cup स्पर्धेसाठी अनेकांनी त्यांचे संभाव्य १५ भारतीय खेळाडू जाहीर केले.  युवराजने २००७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर ८ च्या सामन्यात एका षटकात सलग सहा षटकार मारून इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला रडकुंडीला आणले होते. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच षटकात सहा षटकार मारणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याच्यानंतर हा पराक्रम हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये करून दाखवेल, असा विश्वास युवीने व्यक्त केला आहे.
विराट, रोहित यांनी केव्हा निवृत्त व्हावे? युवा खेळाडूंचा उल्लेख करून युवराज सिंगचं मोठं विधान 
आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत आज युवीने त्याचे मत व्यक्त केले.  भारताला विजेतेपद मिळवायचे असेल जागतिक ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकुमार यादव याने अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे असल्याचे मत युवीने व्यक्त केले. त्याने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सर्वोत्तम कामगिरी करण्याची आवश्यकता असल्याचे देखील सुचवले. युवीने यावेळी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत संभाव्य चार संघांची नावेही जाहीर केली. युवीच्या मते भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व पाकिस्तान हे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. 
पात्र ठरलेले २० संघ...
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा 
 
गटवारी 
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
स्पर्धेचा फॉरमॅट...
- २० संघ
- प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी 
- चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र
- सुपर ८मध्ये  ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी 
- दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत
- फायनल