मुंबई : भारतीय संघातील स्फोटक फलंदाज युवराज सिंग निवृत्तीच्या विचारात आहे. गेली दोन वर्ष युवराज भारताकडून एकही वन डे किंवा ट्वेंटी -20 सामना खेळलेला नाही. भविष्यातही त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळेल याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचे ठरवले आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मान्यतेने होणाऱ्या परदेशातील ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी, अशी अट त्याने ठेवली आहे.
बीसीसीआयकडून ही परवानगी मिळाल्यास निवृत्ती घेणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. '' आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून युवराज निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. त्यासंदर्भात तो बीसीसीआयशी चर्चाही करणार आहे. पण, तत्पूर्वी GT20 ( कॅनडा), Euro T20 Slam (आयर्लंड) आणि हॉलंड येथे होणाऱ्या ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याच्या परवानगीवर त्याला बीसीसीआयच्या उत्तराची अपेक्षा आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी Cricket Countryला सांगितले.
भारताचा माजी गोलंजाज इरफान पठाणला कॅरेबियन प्रीमिअऱ लीगच्या लिलावात खेळाडूंच्या यादीत स्थान देण्यात आले आहे, परंतु त्याने बीसीसीआयकडून परवानगी घेतलेली नाही. ''इरफान अजूनही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. त्यामुळे त्याने कॅरेबियन लीगमधून माघार घ्याव, असे त्याला सांगण्यात आले आहे. युवराजलाही तिच चिंता सतावत आहे. त्यामुळे आम्हाला नियम पाहावे लागतील. त्यामुळे युवीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी बीसीसीआयकडे त्याची नोंद अॅक्टीव्ह ट्वेंटी-20 खेळाडू म्हणून आहे,'' असेही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.