Yograj Singh on Virat Kohli Yuvraj Singh Friendship : टीम इंडियाचा सिंक्सर किंग युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी माजी कर्णधार एमएस धोनी आणि कपिल देव यांना आपल्या विधानांमधून लक्ष्य केले होते. आता एका ताज्या मुलाखतीत त्यांनी विराट कोहलीवर हल्लाबोल केला आहे. एका मुलाखतीत आपला मुलगा युवराज याच्या मित्रांबद्दल बोलताना, योगराज सिंग यांनी विराट कोहलीबाबत अतिशय खळबळजनक विधाने केली आहेत.
विराट कोहली आणि धोनीसह सर्व सहकारी युवराजच्या पाठीत खंजीर खुपसणारे ठरले. विराट कोहली देखील युवीचा मित्र नव्हता, अशा आशयाचे विधान त्यांनी केले. एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग यांना विचारण्यात आले की, विराट कोहली कर्णधार म्हणून युवराजसाठी काही करू शकला असता का? २०१७ मध्ये धोनीनंतर कोहली वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार होता, तेव्हा युवराजला फक्त काही संधी मिळाल्या आणि त्यावेळच्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याला संघातून वगळण्यात आले. एकीकडे युवराज आणि कोहली यांच्यात घनिष्ट मैत्री असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर दुसरीकडे युवराजला संघातून बाहेर करण्यात आले. यावर योगराज सिंग यांनी रोखठोक उत्तर दिले.
पाठीत खंजीर खुपसणारे...
"युवराज सिंग हा प्रचंड प्रतिभावान होता. त्याच्या प्रतिभेला तोड नव्हती. त्यामुळेच प्रत्येकजण त्याला घाबरत होता. यशाच्या पायरीवर कोणतेही मित्र नसतात, तुम्ही एकटे असता. नेहमीच पाठीत खंजीर खुपसणारे असतात. या आयुष्यात जिथे पैसा आणि यश असते, तिथे कोणतेही मित्र नसतात. नेहमीच असे लोक असतात जे तुम्हाला खाली खेचू इच्छितात. मी युवीला सांगितले होते की, एक मित्र शोध आणि मला आणून दाखव असेही बोललो होतो, पण त्याला ते करता आले नाही," असे ते म्हणाले.
सचिन तेंडुलकर बद्दल मोठे विधान
" युवराजची प्रत्येकाला भीती वाटत होती की तो माझी खुर्ची हिसकावून घेईल. कारण तो इतका महान खेळाडू होता. त्याला दैवी देणगी होती. धोनीसह इतर सर्व खेळाडू त्याला घाबरत होते. भारतीय संघात इतक्या वर्षात युवराजचा फक्त एकच मित्र होता आणि तो होता सचिन तेंडुलकर. युवराजला फक्त एकच मित्र आवडतो, तो म्हणजे महान खेळाडू आणि महान माणूस सचिन तेंडुलकर, जो युवराजला आपला भाऊ मानत असे. तो एकमेव असा व्यक्ती आहे जो सर्वांना यशस्वी पाहू इच्छित होता. त्याने कधीही राजकारण केले नाही."