भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) पुन्हा पप्पा झाला आहे. युवराज व हेझल किच यांना कन्याप्राप्ती झाली आहे. युवीनं स्वतः सोशल मीडियावर नन्हीपरीचे फोटो पोस्ट करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ''आम्ही आमच्या लहान राजकुमारी ऑराचे स्वागत करतो आणि आमचे कुटुंब पूर्ण झाले,''असे युवीने ट्विट केले आहे.
पंजाबी कुटूंबात जन्मलेला युवराज हा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू होता. भारताच्या २०११च्या वन डे वर्ल्ड कप विजयात युवीचा सिंहाचा वाटा होता आणि त्याला त्यासाठी मॅन ऑफ दी सीरिज या पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. युवीने चंदीगढच्या DAV शाळेतून शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर पदवीही घेतली. २०१५मध्ये त्याने अभिनेत्री हेझल किचसोबत साखरपुडा केला अन् ३० नोव्हेंबर २०१६ मध्ये दोघंही विवाह बंधनात अडकले. जानेवारी २०२२ मध्ये या दोघांना पुत्रप्राप्ती झाली.
युवीने भारताकडून ४० कसोटीत ३ शतकं व ११ अर्धशतकांसह १९०० धावा केल्या. ३०४ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर १४ शतकं व ५२ अर्धशतकांसह ८७०१ धावा आहेत. ५८ ट्वेंटी-२०त त्याने ११७७ धावा केल्या. शिवाय त्याच्या नावावर १४८ आंतरराष्ट्रीय विकेट्सही आहेत.