Join us  

हे वर्ष आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचे असेल - रवी शास्त्री

‘टी२० विश्वचषकाचे जेतेपद माझ्यासाठी सर्वतोपरी आहे. जेतेपदाचे आव्हान स्वीकारून यंदा केवळ विश्वचषकाच्या तयारीवर भर देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 4:05 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘टी२० विश्वचषकाचे जेतेपद माझ्यासाठी सर्वतोपरी आहे. जेतेपदाचे आव्हान स्वीकारून यंदा केवळ विश्वचषकाच्या तयारीवर भर देत आहे. न्यूझीलंड आणि द. आफ्रिकेविरुद्ध आगामी सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेद्वारे विश्वचषकाला सामोरे जाण्याची तयारी करणार आहोत,’ अशी माहिती भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बुधवारी दिली. शास्त्री यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत विश्वचषकासाठी संघाची तयारी, संघातील वातावरण आणि खेळाडूंच्या दुखापती याविषयी दिलखुलास चर्चा केली.न्यूझीलंड दौऱ्याआधी बोलताना ते म्हणाले, ‘नाणेफेकीबद्दल न बोललेले बरे. आम्ही जगात प्रत्येक देशातील परिस्थितीत त्या संघांविरुद्ध दमदार कामगिरी करू. आमचे हेच लक्ष्य आहे. विश्वचषक जिंकणे हे आमचे स्वप्न असून स्वप्नपूर्तीसाठी सर्वस्व पणाला लावणार आहोत.’ भारताला न्यूझीलंड दौºयात पाच टी२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे असून, द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

सर्व खेळाडू एकमेकांच्या कामगिरीचा आनंद लुटतात, हे सध्याच्या संघाचे वैशिष्ट्य असल्याचे सांगून शास्त्री पुढे म्हणाले, ‘संघात ‘मी’ नाही तर ‘आम्ही’चा वापर होतो. सर्व खेळाडू एकमेकांच्या कामगिरीचे कौतुक करतात. अखेर विजयदेखील संघाचाच होतो.’ आॅस्ट्रेलियाविरुद्ध २-१ ने एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यामुळे संघाची मानसिक ताकद वाढली. पहिला सामना दारुणपणे गमावल्यानंतरही जोरदार मुसंडी मारली,हे मानसिक कणखरतेचे लक्षण आहे.‘आॅस्ट्रेलयाविरुद्ध मायदेशामध्ये नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मिळवलेले यश ही आमची मानसिक ताकद आहे. दडपणामध्ये चांगल्याप्रकारे प्रदर्शन करण्याच्या क्षमतेचा हा पुरावा ठरला. आम्ही निडर खेळ करायला घाबरत नाही. आमचा संघ वर्तमानात परिस्थितीतीत खेळतो आणि भूतकाळात जे घडले तो इतिहास आहे. हीच लय भविष्यातही कायम असेल,’ असे शास्त्री यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)‘केदार जाधवरील टीका निरर्थक’लोकेश राहुलकडून यष्टिरक्षण केले जाईल, असे कर्णधार विराट कोहलीने सांगितले आहे. शास्त्री यांनी यास दुजोरा देत राहुल अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा धनी असल्याचे म्हटले.शिखर धवन जखमी झाल्याने शास्त्री दु:खी आहेत. यावर ते म्हणाले, ‘धवन न्यूझीलंडला येणार नसल्याचे ऐकून निराश झालो धवन अनुभवी आणि मॅचविनर आहे. असे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास नुकसान संघाचे होते. तसेच, केदार जाधववरील टीका निरर्थक आहे. तो एकदिवसीय संघाचा मोलाचा खेळाडू असून, तो न्यूझीलंडमध्ये खेळेल.’ कुलदीप यादव व युझवेंद्र चहल हे अनेक महिने एकदिवसीय सामन्यांत एकत्र खेळले नव्हते. यावर शास्त्री म्हणाले,‘गरजेनुसार संघ निवडला जातो.’न्यूझीलंडमधील खेळपट्ट्यांची काळजी नसल्याचे स्पष्ट करीत शास्त्री पुढे म्हणाले, ‘एक संघ म्हणून आम्ही याबाबत चिंताग्रस्त नाही. परिस्थितीनुरूप खेळण्याची आमची तयारी आहे. इतिहास किंवा भूतकाळ याचा विचार करण्यापेक्षा भविष्याची काळजी घेतलेली बरी, असे माझे मत आहे.’

टॅग्स :रवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघ