India vs England 3rd Test : भारतीय संघाने राजकोट कसोटी जिंकून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. यशस्वी जैस्वालने दुसऱ्या डावात झळकावलेले द्विशतक, दोन्ही डावांत सर्फराज खानची अर्धशतकी खेळी आणि पदार्पणात यष्टींमागे कमाल करून दाखवणारा ध्रुव जुरेल... यांनी राजकोट कसोटी गाजवली. शुबमन गिलनेही दुसऱ्या डावात ९१ धावांची महत्त्वाची खेळी केली होती आणि या सर्वांच्या जोरावर भारताने तिसरी कसोटी ४३४ धावांनी जिंकली. कसोटीतील भारताचा हा मोठा विजय ठरला.
विराट कोहली या कसोटी मालिकेत वैयक्तिक कारणामुळे खेळत नाहीए... लोकेश राहुलने दुखापतीमुळे दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली. त्यात श्रेयस अय्यरला वगळण्यात आणि केएस भरतला फलंदाजीत योगदान देता नाही आले. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत सर्फराज खान व ध्रुव जुरेल या दोन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली गेली. देशांतर्गत स्पर्धांमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांना ही संधी दिली गेली.
हे युवा खेळाडू इंग्लंडच्या बॅझबॉलचा कसा सामना करतील अशी सर्वांनाच चिंता होती, परंतु त्यांनी बॅझबॉलला जशासतसे उत्तर दिले. पहिल्या डावात भारताची आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर रोहित शर्मा व रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंनी शतकं झळकावली. त्यात सर्फराज खानने आक्रमक खेळ करून संघाला चारशेपार पोहोचवले. दुसऱ्या डावात यशस्वीने नाबाद २१४ धावा केल्या. सर्फराज व गिल यांनीही अर्धशतक झळकावली. इंग्लंडसमोर ५५७ धावांचे लक्ष्य ठेवले गेले आणि भारताने १२२ धावांवर त्यांना ऑल आऊट केले. जुरेलने पहिल्या डावात संयमी ४६ धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात त्याने बेन डकेटचा अप्रतिम रन आऊट केला.