Join us

यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

Yashasvi Jaiswal: दिल्ली कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी यशस्वी जैस्वालने अनेक विक्रम मोडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 19:17 IST

Open in App

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय क्रिकेटचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने उल्लेखनीय कामगिरी केली. यशस्वीने २५३ चेंडूंत नाबाद १७३ धावा करत आपले सातवे कसोटी शतक पूर्ण केले. या दमदार खेळीमुळे तो महान खेळाडू डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाजवळ

फक्त २४ वर्षांच्या वयाच्या आत यशस्वीने कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्यांदा १५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. या यादीत त्याच्या पुढे फक्त ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आहेत, ज्यांनी वयाच्या २४ व्या वर्षापूर्वी आठ वेळा ही कामगिरी केली होती.

दिग्गजांच्या शतकांची बरोबरी

कसोटी शतकांच्या बाबतीतही यशस्वीने मोठी झेप घेतली. २४ वर्षांच्या वयाच्या आत यशस्वीने सात शतके पूर्ण करत जावेद मियांदाद, ग्रॅमी स्मिथ, अ‍ॅलिस्टर कुक आणि केन विल्यमसन यांसारख्या दिग्गजांच्या शतकांची बरोबरी केली. डॉन ब्रॅडमन (१२ शतके), सचिन तेंडुलकर (११ शतके) आणि गारफिल्ड सोबर्स (९ शतके) या तिघांनी यशस्वीपेक्षा जास्त शतके केली.

कोहलीच्या खास क्लबमध्ये सामील

कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी १५० पेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी यशस्वीने दुसऱ्यांदा केली आहे. यापूर्वी त्याने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे पहिल्या दिवशी १७९ धावा केल्या होत्या. भारतात ही कामगिरी करणारा यशस्वी हा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्याव्यतिरिक्त, फक्त विराट कोहलीने भारतीय भूमीवर ही कामगिरी केली. २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या दिवशी कोहलीने १५१ धावा केल्या. त्यानंतर २०१७ मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध दिल्ली कसोटीच्या पहिल्या दिवशी १५६ धावा केल्या.

सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा (पहिल्या दिवशी)

धावाफलंदाजप्रतिस्पर्धीठिकाणवर्ष
१९२वसीम जाफरपाकिस्तानकोलकाता२००७
१९०शिखर धवनश्रीलंकागॉल२०१७
१७९यशस्वी जयस्वालइंग्लंडविशाखापट्टणम२०२४
१७३*यशस्वी जयस्वालवेस्ट इंडिजदिल्ली२०२५
१६७गौतम गंभीरश्रीलंकाकानपूर२००९

डावखुऱ्या भारतीय फलंदाजांमधील सर्वाधिक भागीदारी (कसोटी)

भागीदारी (धावा)फलंदाजविकेट क्रमांकप्रतिस्पर्धीठिकाणवर्ष
३००सौरव गांगुली आणि युवराज सिंग५वी विकेटपाकिस्तानबेंगळुरू२००७
२२२ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा६वी विकेटइंग्लंडबर्मिंगहॅम२०२२
२०४ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा७वी विकेटऑस्ट्रेलियासिडनी२०१९
२०३*रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर५वी विकेटइंग्लंडमँचेस्टर२०२५
१९३यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन२री विकेटवेस्ट इंडिजदिल्ली२०२५
English
हिंदी सारांश
Web Title : Yashasvi Jaiswal slams West Indies, shatters records in single innings!

Web Summary : Yashasvi Jaiswal's unbeaten 173 against West Indies put him alongside cricket legends like Don Bradman and Sachin Tendulkar. He achieved several milestones, including joining Virat Kohli in a special club for scoring 150+ runs on the first day of a Test match in India.
टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयशस्वी जैस्वाल