Join us

Yashasvi Jaiswal Ranji Trophy : 12 चेंडूंत 52 धावा; यशस्वी जैस्वालने झळकावले पहिले शतक, मुंबईकडे 794 धावांची आघाडी

मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तराखंडविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेर 794 धावांची आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:31 IST

Open in App

Yashasvi Jaiswal Ranji Trophy : पृथ्वी शॉची आक्रमक खेळी आणि त्यात यशस्वी जैस्वालच्या सुरेख शतकाच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तराखंडविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेर 794 धावांची आघाडी घेतली. पहिला डाव 8 बाद 647 धावांवर घोषित केल्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी उत्तराखंडचा पहिला डाव 114 धावांत गुंडाळला आणि दुसऱ्या डावात 3 बाद 261 धावा केल्या आहेत. पृथ्वीच्या फटकेबाजीने आजच्या दिवसाची सुरुवात झाली, तर यशस्वीच्या आक्रमक खेळीने शेवट झाला... 

सुवेध पारकर ( 252) व सर्फराज खान ( 153) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 8 बाद 647 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर शाम्स मुलानीने  (5-39) निम्मा संघ माघारी पाठवून उत्तराखंडचा पहिला डाव 114 धावांत गुंडाळला. मोहित अवस्थीने दोन, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे व तनुष कोटियान  यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मुंबईच्या दुसऱ्या डावात कर्णधार पृथ्वीने 80 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांसह 72 धावांची खेळी केली. यशस्वी व आदित्य तरे यांनी चांगला खेळ केला. आदित्यने 56 चेंडूंत 57 धावा केल्या. दुसराच प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या यशस्वीने पहिले शतक झळकावले. त्याने 150 चेंडूंत 103 धावा केल्या. यातील 52 धावा या चौकार ( 10) व षटकारांतून ( 2) आल्या. 

उत्तर प्रदेशची ऐतिहासिक कामगिरी, कर्नाटकला नमवून उपांत्य फेरीत 

उत्तर प्रदेश संघाने प्रथमच रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी कर्नाटकवर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. कर्नाटकच्या पहिल्या डावातील 253 धावांच्या प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशने 155 धावाच केल्या. त्यानंतर कर्नाटकचा दुसरा डाव 114 धावांवर गडगडला. 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना करन शर्माने नाबाद 93 धावा केल्या. प्रिन्स यादवनेही नाबाद 33 धावा केल्या. 

टॅग्स :रणजी करंडक
Open in App