दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारी यशस्वी जैस्वालने फलंदाजांमध्ये पुन्हा अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले. त्याचवेळी, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी अनुक्रमे गोलंदाजी व अष्टपैलूंमध्ये अव्वल स्थान कायम राखले.
विंडीजविरुद्ध केलेल्या १७५ धावांच्या खेळीच्या जोरावर जैस्वालने दोन स्थानांनी प्रगती करत पाचवे स्थान पटकावले. त्याच्याव्यतिरिक्त ऋषभ पंत अव्वल दहामध्ये असून, तो आठव्या स्थानी कायम आहे. इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानी कायम असून, त्यानंतर इंग्लंडचाच हॅरी ब्रूक, न्यूझीलंडचा केन विलियम्सन आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ यांचा क्रमांक आहे.
गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान कायम राखले असून, अन्य कोणीही भारतीय अव्वल दहामध्ये नाही. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवने वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत ८ बळी घेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम १४वे स्थान मिळवले आहे. त्याने सात स्थानांची झेप घेतली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज १२व्या स्थानी आहे.
जड्डूचा दबदबा कायम
अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताच्या रवींद्र जडेजाने आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत मालिकावीर ठरलेल्या जडेजाने सर्वाधिक ४२६ गुणांची कमाई केली. त्याच्यानंतर मेहदी हसन मिराझ (बांगलादेश, ३०५), बेन स्टोक्स (इंग्लंड, २९५), विआन मुल्डर (दक्षिण आफ्रिका, २८४) आणि पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया, २७०) यांचा क्रमांक आहे.