Join us

यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?

Yashasvi Jaiswal, Mumbai Team: मुंबई क्रिकेट संघटनेने दिलेले 'ना हकरत पत्र'ही घेतले मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:39 IST

Open in App

Yashasvi Jaiswal, Mumbai Team: भारतीय क्रिकेटमध्ये आयपीएल सुरू असताना देशांतर्गत क्रिकेटमधून मोठी बातमी समोर आली होती. भारतीय संघाचा सलामीवीर आणि मुंबईचा युवा क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल याने मुंबईचा संघ सोडून गोव्याच्या संघाकडून खेळण्याचे निश्चित केले होते. यशस्वी जैस्वालने यासंदर्भात मुंबई क्रिकेट संघटनेला पत्र लिहून NOC म्हणजेच ना हरकत पत्र देण्याची विनंती केली होती. तसेच ही विनंती मुंबई क्रिकेट संघटनेने मान्यही केली होती. त्यामुळे आता यशस्वी जयस्वालचा गोव्याकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण आता यशस्वीने आपल्या निर्णयावरून यु टर्न घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

द इंडियन एक्सप्रेसच्या हवाल्याने देण्यात आलेल्या वृत्तानुसार, यशस्वी जैस्वाल याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्याने आधी मागितलेले 'ना हरकत पत्र' रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याने पत्रात असेही नमूद केले आहे की त्याचा भविष्यात आपल्या कुटुंबासोबत गोव्यामध्ये जाऊन वास्तव्य करण्याचा प्लॅन होता. परंतु काही कारणास्तव तो प्लॅन सध्या रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकडून देण्यात येणारे 'ना हरकत पत्र' रद्द करून त्याला यंदाच्या देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामासाठी मुंबई संघाकडूनच खेळू दिले जावे. तो यंदाच्या हंगामातील मुंबईच्या सर्वसामान्यांच्या निवडीसाठी उपलब्ध असेल.

ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या ट्रॉफी 2024-25 मध्ये यशस्वीने सलामीवीर म्हणून अप्रतिम कामगिरी करून दाखवली होती. त्याने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 43 च्या सरासरीने 391 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे यशस्वी हा केवळ टीम इंडियासाठीच नव्हे, तर मुंबईच्या संघासाठी खूप महत्त्वाचा कसोटीपटू आहे. अशा परिस्थितीत यशस्वीने गोव्याच्या संघात जाण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनला देखील आश्चर्याचा धक्का बसला होता. पण आता यशस्वीने यू टर्न घेतला असल्यामुळे तो यंदाच्या हंगामात मुंबई संघाकडूनच खेळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान यशस्वी ने केलेल्या ई-मेल ला अद्याप एमसीए कडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही आणि यशस्वी च्या मागणीवर अद्याप कुठलाही निर्णयही घेतला गेलेला नाही.

टॅग्स :यशस्वी जैस्वालमुंबईगोवाबीसीसीआय