Join us

WTC: भारतीय उच्चायुक्त ओव्हलच्या मैदानात, रोहित-द्रविडला भेटले, कारण काय?

Rohit Sharma - Rahul Dravid with High Commissioner of India: उच्चायुक्त टीम इंडियाला स्टेडियममध्ये का भेटले? जाणून घेऊया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 11:21 IST

Open in App

Rohit Sharma-Rahul Dravid with High Commissioner of India, WTC Final 2023 IND vs AUS: टीम इंडिया ओव्हलच्या मैदानावर सराव करत होती. त्यानंतर  इंग्लंडमधले भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी स्टेडियममध्ये पोहोचले. त्यांनी भारतीय संघाची भेट घेतली. ही भेट किंवा या भेटीचा व्हिडिओ हा नक्कीच खास होता. कारण टीम इंडिया इतर वेळी जेव्हा परदेश दौऱ्यावर जाते, तेव्हा असा प्रकार पाहायला मिळत नाही, जो लंडनच्या ओव्हल ग्राऊंडवर दिसला. त्यामुळे जाणून घेऊया नक्की काय घडलं.

जेव्हा जेव्हा भारतीय संघ एखाद्या देशाला भेट देतो तेव्हा त्याला त्या देशातील भारतीय राजदूत किंवा उच्चायुक्तांच्या घरी आमंत्रित केले जाते. पण, WTC फायनलसाठी सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावर असे घडले नाही. भारतीय संघ भारतीय उच्चायुक्तांच्या घरी गेला नाही, तर उच्चायुक्त थेट स्टेडियममध्ये जाऊन टीम इंडियाला भेटले.

उच्चायुक्त टीम इंडियाला स्टेडियममध्ये का भेटले?

BCCI ने टीम इंडियासोबत भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक आधी केवळ उच्चायुक्तांच्या घरीच होणार होती. पण, ओडिशातील रेल्वे अपघातामुळे ते होऊ शकले नाही आणि उच्चायुक्तांना मैदानात यावे लागले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की राहुल द्रविडने कसे पुढे जाऊन उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांचे स्वागत केले. रोहित शर्मानेही त्यांच्याशी चर्चा आणि संवाद साधताना दिसला. उच्चायुक्तांनी द्रविड आणि रोहित यांच्याशी दीर्घ संभाषणही केले. याशिवाय भारताचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांनी त्यांच्या बॅटवर स्वाक्षरी केली आणि फोटोही काढले.

दरम्यान, भारत WTC फायनलसाठी सज्ज आहे. डब्ल्यूटीसी फायनलसाठी टीम इंडियाची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही पत्रकार परिषदेत सांगितले की, भारतीय संघाला विजेतेपदाचा पूर्ण विश्वास आहे. खेळपट्टी पाहून आम्ही आमचा अंतिम संघ ठरवू.

Open in App