Join us  

WTC Final 2021: डब्ल्यूटीसी फायनल ड्रॉ झाल्यास भारत-न्यूझीलंड संयुक्त विजेते

WTC Final 2021: हा सामना ड्रॉ झाला किंवा ‘टाय’ झाला तर विजेता कोण असेल, हा प्रश्न सर्वांच्या मनात डोकावत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी या सामन्याबाबतची नियमावली जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 7:57 AM

Open in App

दुबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना खेळला जाईल. हा सामना ड्रॉ झाला किंवा ‘टाय’ झाला तर विजेता कोण असेल, हा प्रश्न सर्वांच्या मनात डोकावत होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शुक्रवारी या सामन्याबाबतची नियमावली जाहीर केली.सामना ड्रॉ झाला किंवा ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेते घोषित करण्यात येईल, असे आयसीसीने म्हटले आहे. १८ ते २२ जूनदरम्यान साऊथम्प्टन येथे हा सामना होईल. २३ जून हा राखीव दिवस असेल. हे दोन्ही निर्णय जून २०१८ ला आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप सुरू करण्याआधीच घेण्यात आले होते, असेही आयसीसीने म्हटले आहे. पाच दिवस सामना खेळला जावा यादृष्टीने राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे. सामन्यातील वेळ वाया गेल्यास या दिवसाचा उपयोग केला जाईल. सामन्यादरम्यान वेळ वाया जात असेल तर सामनाधिकारी नियमितपणे उभय कर्णधार आणि मीडियाला माहिती देतील. राखीव दिवसाचा वापर होणार की नाही, याचा निर्णय पाचव्या दिवशी अखेरच्या तासातील खेळ सुरू होताना घेतला जाईल. 

असे असतील बदल... - भारतीय संघ कसोटीत एसजी तर न्यूझीलंड कुकाबुरा चेंडूचा वापर करतो. या अंतिम सामन्यात मात्र ग्रेड वन ड्यूक चेंडूचा वापर होणार आहे.- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियमात करण्यात आलेले तीन बदल हे फायनलचा भाग असतील. शॉर्ट रन, खेळाडूंची समीक्षा आणि डीआरएस समीक्षा आदींचा समावेश असेल. - मैदानी पंचांनी शॉर्ट रन दिल्यानंतर तिसरे पंच स्वत: आढावा घेतील. पुढचा चेंडू टाकण्या-आधी स्वत:चा निर्णय मैदानी पंचांना कळवेल. - पायचीतसाठी डीआरएस घेण्याआधी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार किंवा बाद झालेला फलंदाज चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता का, याबाबत पंचांकडे विचारणा करू शकेल. - पायचीतसाठी डीआरएस घेण्याबाबत विकेटचे क्षेत्र वाढवून ते स्टम्पच्या उंचीपर्यंत करण्यात आले आहे.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड