Join us  

WTC Final 2021 IND vs NZ : तो निर्णय बदलण्याची होती संधी; पण, पराभवानंतर विराट कोहली म्हणतो, त्याबाबत दुःख वाटत नाही!

सर्वप्रथम केन व त्याच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन.. त्यांनी सातत्यपूर्ण खेळ केला आणि फक्त तीन दिवसांत निकाल लावला. रणनीतीवर ठाम राहून त्यांनी आम्हाला दडपणाखाली ठेवले - विराट कोहली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 11:58 PM

Open in App

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी जोडीनं न्यूझीलंडला पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावून दिले. न्यूझीलंडनं आयसीसी कसोटी वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचताना टीम इंडियावर ८ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. १३९ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रॉस व केन या जोडीनं नाबाद ९६ धावा जोडल्या अन् जेतेपद नावावर केले. रॉस टेलरनं मोहम्मद शमीला स्क्वेअर लेगच्या दिशेनं चौकार खेचला अन् जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final

.. अन् न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये भावनांचा बांध फुटला, जेतेपदाचा असा जल्लोष साजरा झाला, Video 

भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं २४९ धावा करताना ३२ धावांची आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती, परंतु रिषभ पंत व रोहित शर्मा वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले अन् भारताचा दुसरा डाव १७० धावांवर गडगडला. न्यूझीलंडनं १३९ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले. केन व रॉस अनुक्रमे ५२ व ४७ धावांवर नाबाद राहिले. 

विराट कोहली काय म्हणाला?''सर्वप्रथम केन व त्याच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन.. त्यांनी सातत्यपूर्ण खेळ केला आणि फक्त तीन दिवसांत निकाल लावला. रणनीतीवर ठाम राहून त्यांनी आम्हाला दडपणाखाली ठेवले. तेच या विजयाचे खरे मानकरी आहेत. पहिला दिवस पावसामुळे रद्द झाला. आम्ही फक्त तीन विकेट्स गमावल्या होत्या आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय खेळ झाला असता तर अधिक धावा करू शकलो असतो, असे विराट म्हणाला.

फायनलच्या दोन दिवस आधीच टीम इंडियानं प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आणि त्यात दोन फिरकीपटूंना संधी दिली. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर टीम इंडियाला प्लेईंन इलेव्हनमध्ये बदल करण्याची संधी होती, परंतु विराट कोहली त्याच संघावर कायम राहिला.

त्यानं पुढे सांगितले की,आज किवी गोलंदाजांनी ठरल्यानुसार गोलंदाजी केली आणि आम्हाला बॅकफूटवर ढकलले. आम्हाला ३०-४० धावा कमी पडल्या. तुम्हाला त्यासाठी जलदगती अष्टपैलू खेळाडू हवा. दोन दिवस आधी प्लेईंन ११ जाहीर करण्याच्या निर्णयाचे दुःख किंवा खेद वाटत नाही. या कॉम्बिनेशनसोबत आम्ही वेगळ्या वातावरणात विजय मिळवले आहेत. ३+२ कॉम्बिनेशन हे सर्वोत्तम आहे, असा आम्ही विचार केला आणि आमच्याकडे फलंदाजीतही डीपनेस होता. हा सामना आणखी काही वेळ चालला असता तर फिरकीपटूंनी त्याला कलाटणी दिली असती.

संक्षिप्त धावफलक - भारत ( पहिला डाव) - २१७ ( अजिंक्य रहाणे ४९, विराट कोहली ४४, रोहित शर्मा ३४; कायले जेमिन्सन ५-३१) व ( दुसरा डाव) - १७० ( रिषभ पंत ४१, रोहित शर्मा ३०; टीम साऊदी ४-४८, ट्रेंट बोल्ट ३-३९) पराभूत वि. न्यूझीलंड ( पहिला डाव) - २४९ ( डेव्हॉन कॉनवे ५४, केन विलियम्सन ४९, टीम साऊदी ३०; मोहम्मद शमी ४-७६,  इशांत शर्मा ३-४८) व ( दुसरा डाव) - २ बाद १४० ( केन विलियम्सन नाबाद ५२, रॉस टेलर नाबाद ४७, आर अश्विन २-१७) 

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाविराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंड